घरताज्या घडामोडीभर पावसांत व्यापारी उतरले खड्ड्यात

भर पावसांत व्यापारी उतरले खड्ड्यात

Subscribe

स्मार्ट कामाचा नोंदवला निषेध

नाशिक । शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत मेनरोड ते दहीपूल या मार्गावर दोन्ही बाजूने रस्ते खोदण्यात आले आहे. गेली अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या स्मार्ट कामांमुळे संपूर्ण शहरच खड्ड्यात गेले असून या कामामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सुरू असलेले काम तातडीने मार्गी लागावे या मागणीसाठी मेनरोडवरील सर्व व्यापार्‍यांनी भर पावसात खड्ड्यात उतरत स्मार्ट कामाचा निषेध नोंदवला. लवकरात लवकर काम पुर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .

बुधवारी सकाळी महात्मा गांधी रोडवरील दुकानदारांनी एकत्र येत स्मार्ट कामाचा निषेध नोंदवला. या कामामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे खोदल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतींना याचा धोका पोहोचतो आहे.परिणामी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली असुन याला स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात येईल असा इशाराही दिला आहे. गेली अनेक महिने अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या कामाबाबत व्यापार्‍यांनी नाराजीही व्यक्त केली. या कामामुळे या परिसरात वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले असतांना आता कुठे जनजीवन पुर्वपदावर येत असतांना या कामामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. दोन्ही बाजूने रस्ते खोदण्यात आल्याने दुकानांमध्ये जाण्यासाठी या खडडयांवर पत्रे किंवा लाकडी फळया टाकून पूल बनविण्यात आला आहे. यामुळे एखाद्याचा तोल जाऊन अपघात होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाची दखल घेत स्मार्ट सिटीचे अधिकारी शिंदे यांनी घटनास्थळांची पाहणी करत लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी अतुल पवार, विजय सोमवंशी, नाना सोमवंशी, सागर मगर, निलेश कोठारी, सचिन कोपरगांवकर, उदय चौरसिया, गणेश मोगरे आदींसह व्यापारी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -