दलित अत्याचारावर पंतप्रधान बघ्याच्या भूमिकेत : महेश तपासे

भाजप हा भारतीय राज्यघटनेपेक्षा मनूवादी सिद्धांतावर विश्वास ठेवणारा पक्ष असून दलितांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

mahesh tapase

भाजप हा भारतीय राज्यघटनेपेक्षा मनूवादी सिद्धांतावर विश्वास ठेवणारा पक्ष असून दलितांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. ३ जुलै रोजी हैदराबाद येथील कवायत मैदानावर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान भाषण देत असतानाच भाजप कार्यकर्त्यांनी दलित कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. (In the role of watching the Prime Minister on Dalit atrocities says Mahesh Tapase)

“आपली मागणी पंतप्रधानांकडे मांडणाऱ्या दलित कार्यकर्त्यांना हैदराबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करणे हे खरोखरच धक्कादायक आहे.भाजपला मानवतावादी मूल्यांपेक्षा जातीय वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे आणि म्हणूनच दलितांवरील अत्याचारांना अशाप्रकारचे बळ दिले जात आहे”, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

“पंतप्रधान मोदींनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास असे वचन दिले होते परंतु त्यांचा पक्ष त्याच्या अगदी विरुद्ध काम करतो आणि त्यामुळे भाजपच्या राजवटीत दलित आणि आदिवासींना समान आणि न्याय्य वागणूक मिळण्याची अपेक्षा आपण कधीही करू शकत नाही”, असे महेश तपासे यांनी म्हटले.

“दलितांना मारहाण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत असताना समोर घडली मात्र त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याची तसदीही घेतली नाही किंवा त्या घटनेची चौकशीही केली नाही. दलित आणि इतर उपेक्षित समाजाच्या प्रश्नांबाबत भाजप किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते”, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.


हेही वाचा – मला व्हीआयपी ट्रिटमेंट नको, वाहतूक रोखू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना आदेश