राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’, भगूरमध्ये साकारणार भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय

मुंबई – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी राज्यात देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ तयार करण्यात आले आहे. तसेच सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूर (जि. नाशिक) येथे भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून रविवारी सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा आणि कार्यक्रमाचे आयोजनही पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे.

वीर सावरकर पर्यटन सर्किटमध्ये सावरकर यांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभुजा देवी मंदिर, अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली, नाशिक, पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन, पहिली विदेशी कपड्यांची होळी, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिर, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर काही काळ वास्तव्यास होते ती खोली मालक आणि सावरकरांचे सहकारी दामले यांनी तशीच ठेवली आहे. तसेच डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली ते गुरव समाजाचे मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, सावरकरांनी सुरू केलेली कन्या शाळा, सावरकर सदन, सावरकर स्मारक, दादर, बाबाराव सावरकर स्मारक, सांगली या ठिकाणांचा पर्यटन सर्किटमध्ये समावेश आहे.

दरम्यान, स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त रविवारी सकाळी 8 वाजता भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत अष्टभुजा देवीची पालखीही सहभागी होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १०.३० यादरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत्त दीक्षित आणि सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित सावरकर आणि मृत्यू, या संवादाचे बद्रीश कट्टी आणि आदित्य धलवार यांचे अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.