Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर प्रकरणात आखाडा परिषदेची नाहक उडी, सत्यशोधन समिती स्थापन; वाद मिटल्यावर उपरती

त्र्यंबकेश्वर प्रकरणात आखाडा परिषदेची नाहक उडी, सत्यशोधन समिती स्थापन; वाद मिटल्यावर उपरती

Subscribe

धूप दाखवण्याच्या प्रथेचा समिती अभ्यास करणार

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याच्या घटनेनंतर आता आखाडा परिषदेने या वादात उडी घेतली आहे. आखाडा परिषदेच्यावतीने साधू महंतांची एक समिती गठित करण्यात आली असून ही समिती ही घटना कशी घडली, तसेच या प्रथेबददल अभ्यास करून सरकारला अहवाल देणार असल्याचे आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी सांगितले.

ऊरुसाच्या मिरवणुकी दरम्यान त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम धर्मीय बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आले आणि त्यातून वाद उफाळून आला. हिंदू-मुस्लिम वादाची कधी साधी चर्चाही नसलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत तणावाची स्थिति निर्माण झाली. हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलने झाली, पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाडा परिषदेनेही उडी घेतली आहे. याबाबत बोलतांना आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज म्हणाले, त्र्यंबकेश्वर ही कुंभनगरी आहे. भगवान त्र्यंबकेश्वर हा भाविकांच्या आस्थेचा विषय आहे.

- Advertisement -

विविध पुजा विधीसाठी देशवासिय त्र्यंबकेश्वरमध्ये येत असतात. ही घटना घडली तेव्हापासून देशभरातून आखाडा परिषदेला फोन येत आहेत. त्यामुळे ही घटना जाणून घेण्यासाठी सात आखाडयांच्या सात प्रमुखांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती गावातील पुरोहीत, ज्येष्ठ नागरिक, स्थानिकांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतील. तसेच धूप दाखवण्याच्या प्रथेबाबतही माहिती घेतील. ३१ मे पर्यंत हा अहवाल शासनाला सादर केला जाईल. २ जून पासून निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी आमचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परंतू ही समिती मुस्लिम बांधवांची बाजू ऐकून घेणार नसल्याने अहवाल कसा देणार याबाबत विचारले असता ते म्हणाले, घटना मंदिरात झाली त्यामुळे आम्ही केवळ मंदिर पुरोहितांशी चर्चा करू. हिंदु भाविक देखील अजमेर शरीफला भेट देतात परंतू नियमांचे पालन करतात. त्या तिथे असे कधी घडले का मग इथेच असे का घडले याचा शोध या समितीमार्फत घेतला जाईल असे ते म्हणाले. ऊरूस आयोजकांनी यापुढे प्रथाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्ही त्यावर बोलणार नाही. फक्त हा वाद मिटावा अन वस्तुस्थिती समोर यावी याकरीता आमची समिती अभ्यास करेल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -