कुणाच्या वडिलांनी मरावे अशी पोस्ट कुठल्या संस्कृतीत बसते?

सुप्रिया सुळेंचा उद्विग्न सवाल

Supriya Sule's reaction to Sharad Pawar's presidential candidature

मी केतकी चितळेला ओळखत नाही, परंतु मी ज्या संस्कृतीत वाढले त्या संस्कृतीत हे बसत नाही. कुणाच्या वडिलांनी मरावे अशी पोस्ट कुठल्या संस्कृतीत बसते, असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, यानिमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांचेही जाहीर आभार मानते. त्यांनी या कृतीविरोधात भूमिका घेतली. यातून मराठी संस्कृती दिसते. आपण सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे.

केतकी चितळे यांनी पोस्ट डिलीट करायची की ठेवायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी स्व:त भान ठेवून वागते. माझ्यावर मध्यमवर्गीय मराठी संस्कार आहेत. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी ज्या संस्कृतीमध्ये वाढले, त्यात कोणी मरावे असे अपशब्द काढणे बसत नाही. कधीही दुसर्‍या कोणावर जर वेळ आली, तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभी राहीन. कारण ही जी विकृती सुरू झाली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज जी आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. या प्रवृत्तीचे कुठल्याही समाजात समर्थन होऊ शकत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.