घरताज्या घडामोडी'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने हा उपक्रम मी सर्वात प्रथम ठाण्यात राबवला. त्याच धर्तीवर आता मुंबईतही सामान्य नागरिकांसाठी घराजवळच दरखाना हा उपक्रम आजपासून सुरू करण्यात येत आहे. मुंबईकरांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने हा उपक्रम मुंबईकरांसाठी संजीवनी व वरदान ठरणार आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुंबईतील केईएम, सायन, नायर आदी प्रमुख रुग्णालयात लहान – सहान आजारांवर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचा ताण कमी व्हावा, त्या रुग्णांना घराजवळच पालिकेच्या दवाखान्यात, अपेक्षित प्राथमिक वैद्यकीय चाचण्या व औषधोपचार मोफत मिळावेत या बहुउद्देशाने मुंबई महापालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने उपक्रम त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी धारावी येथे सुरू केला. पहिल्या टप्प्यात ५१ ठिकाणी हे दवाखाने सुरू करण्यासाठी या उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धारावी येथे प्रत्यक्ष व दुरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

- Advertisement -

या कार्यक्रमाप्रसंगी, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार राहुल शेवाळे, पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाण्याच्या धर्तीवर मुंबईत घराजवळच आपला दवाखाना उपक्रम

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रत्येक मुंबईकर हा सुखी व्हावा, त्याला सर्व सुखसुविधा मिळाव्यात, त्याचे आरोग्य सुदृढ राहावे, असे वाटत असे. त्यांचा हाच विचार घेऊन आम्ही ठाण्यात ५० ठिकाणी सर्वप्रथम हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम यशस्वीपणे राबवला. आता मुंबईतही त्याच धर्तीवर हा घराजवळ दवाखाना उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुंबईकरांना खासगी दवाखान्यात महागडे उपचार, औषधे परवडत नसल्याने त्यांना या दवाखान्यात मोफत १५० वैद्यकीय चाचण्या, एक्सरे, एमआरआय आदी सुविधा व औषधोपचार देण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील सायन, नायर, केईएम यांसारख्या मोठ्या रुग्णालयांवरील आरोग्य सेवांबाबत येणारा ताण दूर होण्यास मोठी मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या दवाखान्यांमुळे मुंबईत पैशांअभावी आरोग्य सुविधा मिळणार नाहीत, असे कधी घडणार नाही. मुंबईतील प्रत्येक विभागात किमान एक याप्रमाणे २२७ वार्डात सदर दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईतील दवाखाना उपक्रमाला जगातील लोक भेट देतील : मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

मुंबईत दर ५०० मिटर अंतरावर पालिकेचा एक दवाखाना असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला घराजवळच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या दवाखाना उपक्रमाला भारतातीलच नव्हे तर जगातील लोक भेट देतील व कौतुक करतील, असा आत्मविश्वास मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री कॅबिन मध्ये बसून न राहता कामे करतात : दीपक केसरकर, पालकमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हाडाचे शिवसैनिक आहेत. ते कॅबिनमध्ये बसून राहत नाहीत. त्यांचा कामांचा ठसा मुंबईकर अनुभवत असून ते लवकरच मुंबईकरांना विविध सेवासुविधा उपलब्ध करून मुंबईचा कायपालट करणार आहेत, असा टोला मुंबई शहर विभागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.

धारावीत एका महिन्यात १५ ठिकाणी दवाखाने सुरू होणार : खा. राहुल शेवाळे

दिल्लीमधील मोहल्ला क्लिनिकपेक्षाही मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांना शंभर पट जास्त आरोग्य सुविधा मिळणार आहेत. तसेच, आपला दवाखाना उपक्रम ही धारावीची गरज असून त्याची सुरुवात धारावीतून होत आहे. येत्या महिन्याभरात धारावीत १५ ठिकाणी हे दवाखाने सुरू होणार आहेत. या दवाखान्याच्या उपक्रमाचे कौतुक देशभरात होईल, असा आत्मविश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केला. पालिकेतर्फे सुरू करण्यात येत असलेल्या या घराजवळ दवाखाना उपक्रमात नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच, पुढील काळात एकही दवाखाना पुढील बंद होणार नाही, असे प्रतिपादन पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी यावेळी केले.


हेही वाचा : सावरकरांवरील वक्तव्याविरोधात ठाण्यात शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -