कैद्यांच्या भजन स्पर्धेचे अजित पवार आणि गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन; कैद्यांनी चांगली पुस्तके वाचल्यास बदल निश्चित – अजित पवार

Ajit Pawar criticized Raj Thackeray

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी “या स्पर्धेच्या माध्यमातून कैद्यांनी चांगली पुस्तके वाचली आणि आपल्या विचारात बदल घडवला तर, निश्चितपणे बदल होईल. तसंच, मोठ्याप्रमाणात आरोपी कमी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल.”, असे म्हटले.

“कैंद्याची ज्यावेळी शिक्षा संपते त्यावेळेस तुरुंगातून बाहेर पडत असताना आपण केलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त व्हावे, यासाठी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान संतांनी अभंग, किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून विचार सांगितलेले आहेत. त्यामुळे कैद्यांनी अशाप्रकारची चांगली पुस्तके वाचली आणि आपल्या विचारात बदल घडवला तर, निश्चितपणे बदल होईल. तसंच, मोठ्याप्रमाणात आरोपी कमी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल.”, असे अजित पवार यांनी कैंद्यांच्या भजन स्पर्धेच्या उद्धाटनावेळी म्हटले.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने कारागृहातील कैद्यांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत एकूण २७ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा २० ते ३० मे या कालावधीत प्रत्येक कारागृहात होणार आहे. कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कलागुणांना भक्तिमार्ग, अध्यात्म व भजनाद्वारे वाव मिळावा, बंदिजनांमध्ये सकारात्मक विचार वाढीस लागावे, थोडा विरंगुळा मिळावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

कैंद्यांसाठी आयोजित केलेली देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा आहे, असा दावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला. त्यामुळे या भजन स्पर्धेच्या माध्यमातून कैद्यांमध्ये बदल घडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कैंद्यांना मिळणारे पारितोषिक

  • प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र
  • द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र
  • तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र

प्रतिष्ठानचे सदस्य कारागृहात जाऊन स्पर्धेचे परिक्षण करणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय चार फूट आकाराची फ्रेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 100 पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.


हेही वाचा – समृद्धी महामार्गालगतच्या सीएनजी गॅस पाईपलाईनचा ‘इतक्या’ जिल्ह्यांना होणार फायदा