घरमहाराष्ट्रअजित पवार यांच्या अडचणीत वाढ पार्थ पवारांच्‍या कार्यालयावर आयकर खात्‍याचे धाडीसत्र

अजित पवार यांच्या अडचणीत वाढ पार्थ पवारांच्‍या कार्यालयावर आयकर खात्‍याचे धाडीसत्र

Subscribe

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातार्‍याच्या निकटवर्तींयावर सकाळपासूनच छह्वापेमारी

राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या चर्चगेट येथील कार्यालयावर गुरूवारी सकाळी सहा वाजता आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला. जवळपास आठ अधिकार्‍यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची ही कारवाई झाल्याने तो अजित पवारांना थेट संदेश असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईआधी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्या कोल्हापूरच्या घरी व त्यांच्या मुक्ता पब्लिकेशनवर आणि दुसर्‍या भगिनी रजनी इंदुलकर यांच्या पुण्यातील पंचवटी येथील निवासस्थानी अधिकार्‍यांनी छापेमारी केली.

सकाळपासून सुरू असलेली छापेमारी संध्याकाळपर्यंत सुरू होती. अजित पवार हे आता पुढील टार्गेट असण्याची शक्यता आहे. सातार्‍यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावरील धाडींनंतरही पवार यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले जात असताना आता त्यांच्या सख्या बहिणींच्या घरी आणि व्यावसायिक कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेेत. केंद्रीय संस्थांच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयकर विभागाच्या कारवाईचे समर्थन केले आणि आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारी अंमलबजावणी संचालनालयाकडे करण्याचा इशारा दिला. आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर धाडी टाकल्यानंतर आता या कारखान्याच्या संचालकांच्या घरीही धाडी सत्र सुरू झाल्या असून बारामतीतही काही छापे टाकल्याचे खात्रीलायक वृत्तआहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या आखत्यारातील आयकर, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरांवर, त्यांच्या व्यवसायांवर विविध ठिकाणी धाडी टाकून त्यांना जेरीस आणले आहे. विशेषत: महाराष्ट्रात या संस्थांनी कारवाया करताना अगदीच खालचा दर्जा राखल्याचा आरोप केला जात आहे. अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यावर धाडी टाकण्यात आल्यापासून यंत्रणांनी अजित पवार हे कुठे सापडतात काय त्याचा अंदाज घेतला. जुलै महिन्यात या कारखान्याची ६५ कोटींची मालमत्ता ईडीने सील केली. मात्र, काहीच हाती लागत नाही, असे पाहून मग दौंड शुगर, आंबलीक शुगर, पुष्पद नतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांसह अजित पवार यांच्या बहिणी विजया पाटील यांच्या कोल्हापूर येथील मुक्ता पब्लिकेशनवर आयकर अधिकार्‍यांनी छापेमारी सुरू केली. याशिवाय पुण्यातील दोन चुलत बहिणींच्या घरांवरही आयकर अधिकार्‍यांनी धाडी टाकल्या.

आयकर विभागाच्या या कारवाईची विरोधी पक्षांनी जोरदार निंदा केली आहे. इतक्या खालचे राजकारण केंद्रातले सरकार करते आणि त्याला सत्ताधारी पक्ष खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. लखीमपूर घटनेने भाजपच्या झालेल्या बदनामीतून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी साखर कारखान्यांवर धाडी टाकल्या जात असल्याचे पाटील म्हणाले. केवळ सनसनाटी निर्माण करणे हाच या धाडीमागचा हेतू आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याचा संताप काढण्यासाठी त्यांनी साखर कारखान्यांवर धाडी टाकल्या, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.भाजपचे नेते आमच्या नेत्याचे नाव घेतात. त्यानंतर ईडी, आयकर विभाग यांच्या धाडी होतात. आम्हाला बदनाम करण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे. यात शंका नाही. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला आहे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.या छापेमारीसाठी आयकर विभागाने सीआरपीएफच्या जवानांची मदत घेतल्याचे स्पष्ट दिसत होते.

- Advertisement -

सातार्‍यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यातही केवळ वातावरण निर्मिती करायचा मार्ग अधिकार्‍यांकरवी रचला गेला. जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कारखान्याची विक्री झाली आहे. ईडीच्या कारवाईला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय याआधीच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले.

निकटवर्तीय केंद्राच्या रडारवर

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे चर्चगेट येथील कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोरडियांचे कार्यालय, अजितदादा यांच्या बहिणींच्या कोल्हापूर-पुणे येथील घरी, डीबी रियालिटी, विवेक जाधव यांचे मुंबईतील घर अशा काही ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली.

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी कुठे छापे मारावेत, हा अधिकार त्यांचा आहे. आमच्या संबंधित उद्योगांचा कर आम्ही वेळोवेळी भरला आहे. आमच्या संबंधित कारखान्यांवर धाडी घालण्याविषयी मी काही बोलणार नाही. तो संबंधितांनी केलेल्या राजकारणाचा भाग होता. पण माझ्या कुटुंबियांच्या घरी आणि व्यवसायावर धाडी घालण्याचे उद्योगही या संस्था करू लागल्या आहेत, हे अगदीच अयोग्य आहे. इतक्या खालच्या पद्धतीचे राजकारण आजवर कोणीच केले नाही. -अजित पवार, उपमुख्यमंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -