घरमहाराष्ट्रजयपूरच्या फेअरमोंट हॉटेलवर आयकरचे छापे; महाराष्ट्रातील 'या' राजकीय नेत्याशी कनेक्शन

जयपूरच्या फेअरमोंट हॉटेलवर आयकरचे छापे; महाराष्ट्रातील ‘या’ राजकीय नेत्याशी कनेक्शन

Subscribe

महाराष्ट्रात गेल्या चार पाच दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. ही छापेमारी आता राजस्थानपर्यंत पोहोचली असून जयपूरमधील फेअरमोंट हॉटेलवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या कारवाईचं कनेक्शन महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याशी असल्याचं बोललं जात आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, तीन बहिणी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. त्यामुळे जयपूरमधील फेअरमाँट हॉटेलवर मारलेला छापा आणि त्यात सापडलेली कागदपत्रे यांचा या छाप्यांशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या कारवाई संदर्भात आयकर विभागाने अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार जयपूरमधील फेअरमोंट हॉटेलसह दोन हॉटेल संचालकांवर मुंबईच्या आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तसंच, या हॉटेलच्या संचालकांच्या कार्यालय आणि निवासस्थानांवर देखील छापे टाकले आहेत. या कारवाईत आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, ज्वेलरी आणि रोकड ताब्यात घेतली आहेत. आर्थिक व्यवहारांशी संबंधित स्लिप आणि जमिनीतील गुंतवणुकीचे पुरावे, तसंच दागिने जप्त करण्यात आले आहेत. गेल्या ४ दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे. फेअरमोंट हे तेच हॉटेल आहे जेव्हा राजस्थानमध्ये राजकीय घडमोडी घडत होत्या तेव्हा काँग्रेसच्या आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तसंच, राजस्थानचे मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांचा हॉटेलच्या संचालकांशी संबंध असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.

- Advertisement -

जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलवरील कारवाईबद्दल ट्वीटर यूझर निरज गुंडे यांनी ट्विट केलं आहे. निरज गुंडे हे सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांसंदर्भात ट्विट करत असतात. विशेष म्हणजे निरज गुंडे यांना भाजपचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या ट्विटरवर फॉलो करतात.

- Advertisement -

दरम्यान, आयकर विभागाने गेल्या ६ महिन्यांपासून मिळत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर महाराष्ट्रात छापे टाकले होते. त्याच्याशी संबंधित ही कारवाई मानली जात आहे. आयकर विभागाने गेल्या सहा महिन्यांपासून मिळत असलेल्या माहितीच्या आधारावर २३ सप्टेंबर २०२१ पासून मुख्य कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईत मोठी भांडाफोड झाली आहे. यात महाराष्ट्रातील विशिष्ट उद्योगपती, दलाल आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. आयकर विभाग सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून याबाबतची माहिती गुप्तचरांकडून घेत होता. यानंतर २५ निवासस्थाने, १५ कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. तर ४ कार्यालयांची रेकी करण्यात आली. आयकर विभागाच्या कारवाईत एकूण १ हजार ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले आहेत.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि निकटवर्तीयांच्या कंपन्या आणि घरांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नरीमन पॉईंट येथील निर्मल भवन इथल्या सीड ट्री इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर ही कारवाई सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कारवाई सुरु आहे. याशिवाय, अजित पवार यांच्या तीन बहिणी त्यांच्या कार्यालयावर, घरांवर देखील छापे टाकले आहेत. या कारवायांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी पाहुणे घरी आले आहेत, त्यांचा तपास करु द्या, तपास झाल्यानंतर बोलू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राजस्थानमधील जयपूर येथील फेअरमोंट हॉटेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे बोलले जाते. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार, बहिणी आणि निकटवर्तीयांवर मारलेले छापे आणि फेअरमोंटवर मारलेले छापे यांचा संबंध असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांकडून समजते. लवकरच याबाबतीत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -