वसंतदादा साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा; अभिजीत पाटलांचा संदर्भ

देवळा : तालुक्यातील विठेवाडी येथील धाराशिव साखर कारखाना लि. युनिट २ संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर आयकर विभागाचा गुरुवार (दि.२५) रोजी छापा पडला आहे. याबाबत अत्यंत गोपनीयता पाळत चौकशी सुरू असून याबाबत नेमके काय निष्पन्न झाले हे अद्याप समजले नसल्याने कारखाना कार्यस्थळावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. डिव्हीपी ग्रुपच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने २५ वर्षांसाठी वसाका कारखाना भाडेतत्वावर घेतला आहे. अभिजित पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन कारमधून काही अधिकारी वसाका कारखान्याच्या कार्यस्थळावर आले असल्याचे समजते. हिंदीतून बोलणाऱ्या या अधिकाऱ्यांनी अकाउंट अर्थात लेखा विभागात चौकशीला सुरुवात केली असून प्रत्येक रजिस्टरमधील नोंदींची सविस्तर माहिती घेतली जात आहे. सायंकाळ पर्यंत आयकर विभागाच्या तपासणीचे काम सुरू होते. याबाबत उशिरापर्यंत कोणतीही आयकर विभागाकडून अधिकृत माहीती समजू शकली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अधिकारी कधीपर्यंत ठाण मांडून बसतील याबाबत सांगता येणार नसल्याचे सांगितले. कारखाना व्यवस्थापनाचे महत्वाचे अधिकारी व कर्मचारी यांना आतच ठेवले असून कुणालाही बाहेर निघू दिले जात नाही. तसेच त्यांचे मोबाईल फोनही जमा करण्यात आले आहेत. या कारवाई बाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत असून कारखाना स्थळावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात येण्याजाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

या कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याकडे एकूण पाच कारखाने असून धाराशिव कारखान्यासह पंढरपूर तसेच उस्मानाबाद येथील त्यांच्या इतर कारखान्यांवरही तसेच अभिजित पाटील यांच्या निवासस्थानीही छापा टाकत कारवाई सुरू असल्याचे समजते. साखर उद्योगातील साखर सम्राट अशी अभिजित पाटील यांची ओळख आहे. वसाका कारखाना स्थापनेपासून पहिल्यांदाच येथे आयकर विभागाची धाड पडली असल्याने तालुक्यात या कारवाईची चर्चा जोरात होत आहे. यातून काय निष्पन्न निघेल ते आताच सांगता येणार नसले तरी सहकार तत्वावरचा हा कारखाना २०१८-१९ पासून भाडेतत्वावर देण्यात आल्याने या कारखान्याला आयकर विभागाला तोंड देण्याची वेळ आल्याने सभासदांसह कर्मचारी व कामगार वर्ग याकडे लक्ष देऊन आहे.