Eco friendly bappa Competition
घर क्राइम Income Tax raid : हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालमत्तांवर छापेमारी, पाच राज्यांत...

Income Tax raid : हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालमत्तांवर छापेमारी, पाच राज्यांत कारवाई

Subscribe

मुंबई : देशातील सर्वात मोठा हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (hawala operator Nandkishore Chaturvedi) याच्याशी संबंधित पाच राज्यांतील विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) बुधवारी छापे टाकले. पुष्पक बुलियन कंपनीशी संबंधित मुंबईतील मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू असलेला नंदकिशोर चतुर्वेदी दोन वर्षांहून अधिक काळ फरार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परदेशातून उद्या, शुक्रवारी मुंबईत परतत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीच ही छापेमारी करण्यात आली आहे, हे उल्लेखनीय.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि एनसीआरमधील विविध मालमत्तांवर बुधवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) चतुर्वेदी याला यापूर्वी अनेक वेळा समन्स बजावले आहेत, परंतु तो कधीही ईडीसमोर हजर झाला नाही. चतुर्वेदी ना त्यांच्या निवासस्थानी, ना त्यांच्या कार्यालयात सापडला. तो आजच्या तारखेपर्यंत फरारच आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

ईडीने गेल्या वर्षी पुष्पक बुलियन मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिका जप्त केल्या आहेत. चतुर्वेदींची शेल कंपनी असलेल्या हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडने पाटणकर यांच्या मालकीच्या आणि नियंत्रण असलेल्या फर्मला विनातारण कर्ज दिल्याच्या आरोपावरून ईडीच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणात नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर (मनी लॉन्डरर) असल्याचे उघड केले.

नोटाबंदीनंतर (demonetisation) ईडीने पुष्पक बुलियन आणि इतर समूह कंपन्यांविरुद्ध चौकशी सुरू केली आणि सप्टेंबर 2017मध्ये चंद्रकांत पटेल याला अटक केली. नोटाबंदीनंतर पटेलने काळ्या पैशांतून 280 किलो सोने खरेदी केल्याचा आरोप आहे. यानंतर, नोव्हेंबर 2017मध्ये, ईडीने या कंपनीशी संलग्न असलेली 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. तसेच, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्षाच्या काही नेत्यांशी संबंधित कंपन्यांबरोबर चतुर्वेदीच्या शेल कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केल्या असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

कथित मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा व्यवहार आणि कोट्यवधी रुपयांच्या करचुकवेगिरीच्या आरोपाखाली चतुर्वेदी यांच्या शेल कंपन्यांची चौकशी सुरू आहे. वस्तुत: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्याशी संलग्न किंवा सहभाग असलेल्या कंपन्या नंदकिशोर चतुर्वेदी यांनी ताब्यात घेतल्या आहेत, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे.

कोण आहे नंदकिशोर चतुर्वेदी?

नंदकिशोर चतुर्वेदी हा मूळचा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आणि एक चार्टर्ड अकाऊंटंट आहे. सुरुवातीला तो लहान-लहान उद्योजकांसाठी वार्षिक आर्थिक नियोजन करून देत असे. आता त्याच्याविरोधात लूक-आउट नोटीस जारी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तो प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या शेल कंपन्यां तो चालवतो आणि अशा जवळपास 150 कंपन्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे मुख्यालय कोलकातामध्ये असले तरी ते कागदावरच असल्याचे सांगितले जाते.

या कंपन्यांच्या व्यवहाराद्वारे मिळालेला नफ्यातून उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, मुंबई आणि पुणे, इतर दक्षिणेकडील शहरांमधील मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याचे दाखवण्यात आले आहे. नंदकिशोर चतुर्वेदी तपास यंत्रणांच्या जाळ्यात सापडला तर, अनेक राजकीय नेते आणि उद्योगपतींबरोबरचे त्याचे लागेबांध उघड होतील, असे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -