महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने राज ठाकरे यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. राज यांच्या ताफ्यात एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी भोंग्यांविरोधात आंदोलन छेडल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती.
या धमकीपत्राच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली होती. राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांची संख्या वाढवली आहे.
राज्य सरकार थट्टा करतेय का?– बाळा नांदगावकर
मी राज्याच्या गृहमंत्र्यांना काही दोष देणार नाही. राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा. राज्य सरकारची एक समिती असते. ही समिती कुणाला किती सुरक्षा पुरवायची याबाबतचा निर्णय घेते. या समितीत मुख्यमंत्री आणि आणखी एक-दोन जण असतात. राज ठाकरे यांना आधी झेड सिक्युरिटी होती. ती कमी करून वाय करण्यात आली. मी गृहमंत्र्यांना भेटून पुन्हा झेड दर्जाची सुरक्षा देण्याची विनंती केली होती, पण मी जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा एक इन्स्पेक्टर आणि एक पोलीस दिला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरू आहे का? त्यापेक्षा सुरक्षा देऊच नका, असा संताप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.