घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडीची वाट बिकट; मंत्री कामे करण्यासाठी टक्केवारी मागतात : आशिष जैस्वाल

महाविकास आघाडीची वाट बिकट; मंत्री कामे करण्यासाठी टक्केवारी मागतात : आशिष जैस्वाल

Subscribe

राज्यातील मंत्री आमदारांकडे टक्केवारी मागतात. टक्केवारी मागणार्‍या मंत्र्यांची आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. संबंधित मंत्री मतदारसंघाच्या कामातूनदेखील पैसे मागतात. मंत्र्यांना आर्थिक मोबादला दिला तरच ते मतदारसंघासाठी निधी देतात, असे गंभीर आरोप आशिष जैस्वाल यांनी सोमवारी केले.

येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. आपल्या सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून अपक्ष तसेच लहान पक्षांतील आमदारांची जुळवाजुळव सुरू असतानाच अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांनी राज्यातील मंत्र्यांवर टक्केवारी मागत असल्याचे गंभीर आरोप सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. तर दुसरीकडे राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धान आणि हरभरा खरेदीच्या प्रश्नावर कोंडीत पकडले आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देखील सर्वच पक्षांमध्ये माझे मित्र आहेत, कुणीही आमची भूमिका गृहीत धरू नये.१० जूनलाच कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू, अशी भूमिका घेतली असल्याने महाविकास आघाडीच्या तंबूत चांगलीच घबराट पसरली आहे. सरकारमध्ये सामील असलेल्या या आमदारांच्या नाराजीनाट्यामुळे महाविकास आघाडीची वाट अवघड झाल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील मंत्री आमदारांकडे टक्केवारी मागतात. टक्केवारी मागणार्‍या मंत्र्यांची आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. संबंधित मंत्री मतदारसंघाच्या कामातूनदेखील पैसे मागतात. मंत्र्यांना आर्थिक मोबादला दिला तरच ते मतदारसंघासाठी निधी देतात, असे गंभीर आरोप आशिष जैस्वाल यांनी सोमवारी केले, तर संपूर्ण महाराष्ट्रात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख, तर धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख आहे. केंद्र सरकार शेतमाल खरेदी करीत नाही. त्यामुळे त्यांनी एका हेक्टरला हजार रुपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात. आमचे मतदान भाजपला जाणार नाही, मात्र महाविकास आघाडीलादेखील शेवटच्या ५ मिनिटांत मतदान करू, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केले.

- Advertisement -

जैस्वाल यांच्या आरोपांवर विचारणा केली असता निवडणुकीमुळे छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांना आणि अपक्षांच्या भूमिकांना धार येते, पण जैस्वाल हे शिवसेनेचेच आहेत. ते नाराज नाहीत, असे मत व्यक्त करीत शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घेतली. दुसरीकडे मंत्री आमदारांकडे टक्केवारी मागतात ही बाब भीषण असून हे वसुली सरकार आहे, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

सेनेचे आमदार वर्षावरून थेट हॉटेल रिट्रिटमध्ये
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजाराचे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी सर्व सेना आणि अपक्ष आमदारांची बैठक घेतली. मतदान करताना कुणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रामाणिकपणाने काम करणार्‍या एकनिष्ठ कार्यकर्त्याला कधी ना कधी फळ मिळतेच, असे म्हणत त्यांनी सर्व आमदारांना मविआच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. शिवसेनेने सतर्कता बाळगत बैठकीआधीच सर्व आमदारांना १० जूनपर्यंतची बॅग भरून आणण्यास सांगितले होते. वर्षावरील बैठक संपताच सर्व आमदारांची रवानगी थेट मार्वे येथील हॉटेल रिट्रिटमध्ये करण्यात आली.

- Advertisement -

फडणवीसांचे अपक्ष आमदारांना फोन
कोरोना झाल्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अनेक अपक्ष आमदारांना स्वत: फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या उमेदवाराला मत देऊन पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी अपक्ष आमदारांना केले. त्यातील काही आमदारांनी त्यांना संमिश्र प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

देशमुख, मलिक यांच्या मतदानाचा उद्या फैसला
राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर त्यांना मतदान करता येणार किंवा कसे, याचा फैसला बुधवारी होणार आहे. ईडीच्या कारवाईनंतर मलिक आणि देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात अर्ज करून मतदानासाठी परवानगी मागितली होती. या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. येत्या ८ जूनला यावर सुनावणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -