मुंबई : “जुडेगा भारत… जितेगा इंडिया”चा नारा देत देशातील 28 पक्ष हे भाजप विरोधात लढा देण्यासाठी एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीची बैठक कालपासून (ता. 31 ऑगस्ट) सुरू झाली असून या बैठकीचा आजचा (ता. 01 सप्टेंबर) दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल असलेल्या ग्रँड हयात मध्ये ही बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी 28 राजकीय पक्षांचे 63 प्रमुख नेते उपस्थित राहिलेले आहेत. परंतु आज आणखी एका नेत्याने या बैठकील उपस्थिती लावल्याने इंडिया आघाडीतील काही पक्षांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सपाचे राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी या बैठकीत येऊन वादाची ठिणगी टाकल्याचे बोलले जात आहे. (INDIA Alliance : Kapil Sibbal entry in the meeting without invitation)
हेही वाचा – ‘वन नेशन वन इलेक्शन’पेक्षा फेअर इलेक्शन घ्या, संजय राऊत यांनी मोदी सरकारला सुनावले
कपिल सिब्बल हे आधी काँग्रेस पक्षामध्ये होते, परंतु मे 2022 मध्ये त्यांनी पक्षातून बाहेर पडत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला. महत्त्वाची बाब म्हणजे सपा पक्षाकडून या बैठकीत अखिलेश यादव आधीच उपस्थित राहिले आहेत. पण सिब्बल यांना कोणतेही आमंत्रण नसताना ते या बैठकीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबतची नाराजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.
काँग्रेस पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला. परंतु, त्यानंतर काही वेळाने फारुख अब्दुल्ला आणि अखिलेश यादव यांनी के. सी. वेणुगोपाल यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तर राहुल गांधी यांनी त्यांना कोणाच्याही येण्याने कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सिब्बल यांच्या येण्याने काही काळ का असेना पण नाराजीचे वातावरण पसरलेले पाहायला मिळाले. परंतु काही वेळाने नाराज नेत्यांची समजूत काढल्यानंतर इंडिया आघाडीच्या फोटोसेशनमध्ये कपिल सिब्बल यांना देखील सहभागी करून घेण्यात आले.
कपिल सिब्बल हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. परंतु त्यांनी मे 2022 मध्ये काँग्रेस पक्षाला राजीनामा देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. कपिल सिब्बल हे काँग्रेसमधील G-23 या गटाचा भाग होते. ते पक्षाच्या ध्येय धोरणांवर नाराज होते. ज्यानंतर सिब्बल यांनी कोणालाही पत्ता लागून न देता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ज्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली होती. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याऐवजी सामूहिक नेतृत्त्व असावे, हे मत त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते. या मुद्द्यावरून देखील त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.