सातारच्या सुरेखा यादवचा आणखी एक पराक्रम, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट

. मुलींना गाडी चालवता येत नाही, जर तुम्हाला कोणी सांगितलं तर सातारच्या सुरेखा यादवचं नाव जरूर सांगा.

Vande-Bharat-Express

मुलींना गाडी चालवता येत नाही, असे म्हणणारे महिला आता चक्क ट्रेन चालवू लागल्या आहेत, हे ऐकल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसणं हे सहाजिकच आहे. मुलींना गाडी चालवता येत नाही, जर तुम्हाला कोणी सांगितलं तर सातारच्या सुरेखा यादवचं नाव जरूर सांगा. कारण ही महिला फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या आहेत. सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली. या कामगिरीबद्दल सुरेखाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर तिच्या सहकारी ट्रेन पायलटनी जोरदार स्वागत केलं.

गेली ३४ वर्षे रेल्वेत सेवा केलेल्या सुरेखा यादव यांनी महिला दिनाच्या दिवशी एका माध्यमाशी बातचीत करत असताना २०२१ मध्ये वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळाली. सोलापूरहून वंदे भारत एक्सप्रेस वेळेवर निघाली आणि वेळेच्या १५ मिनिटे आधी सुरेखा यादव यांनी सीएसएमटीला आणली. त्यामुळे त्यांचं सर्वच स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

यावर आपली प्रतिक्रिया देताना सुरेखा यादव म्हणाल्या की, मला वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभारी आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून वेळेवर निघाली आणि ५ मिनिटे आधी सीएसएमटीला पोहोचली. मात्र, ट्रेन चालवण्यापूर्वी आधी संपूर्ण माहिती घेतली आणि मगच गाडी चालवायला निघाले. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो.”

कोण आहे सुरेखा यादव?
सुरेखा यादव यांचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी सातारा येथे झाला. सातारा येथील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमधून तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम घेतला आणि नंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला. तिला कधीच लोको पायलट व्हायचे नव्हते. सामान्य मुलींप्रमाणे बी-एड पदवी करून शिक्षिका होण्याचे तिचे स्वप्न होते. पण जेव्हा ती भारतीय रेल्वेत काम करू लागली, तेव्हा तिला लोको पायलट व्हायची इच्छा झाली.

तांत्रिक पार्श्वभूमी आणि लहानपणापासूनच ट्रेन्सची आवड यामुळे सुरेखाने पायलटसाठी फॉर्म भरला. १९८६ मध्ये त्यांनी लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आणि मुलाखतीसाठी पात्र ठरले. यानंतर सुरेखाला पुढील सहा महिन्यांसाठी कल्याण ट्रेनिंग स्कूलमध्ये सहाय्यक चालक म्हणून नियुक्त करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८९ मध्ये त्या नियमित सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या.

सुरुवातीला सुरेखा यांची मालगाडीची चालक म्हणून नियुक्ती झाली होती. जिथे त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य आणखीनच सुधारले. २००० मध्ये त्यांना मोटर वुमन पदावर बढती मिळाली. २०१० मध्ये त्यांना पश्चिम घाट रेल्वे मार्गावर ट्रेन चालवण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०११ मध्ये त्या ‘एक्स्प्रेस मेल’च्या पायलट बनल्या. प्रत्येक प्रमोशनसोबत सुरेखाने आणखी एक मैलाचा दगड आपल्या नावावर केला आहे. २०११ मध्येच महिला दिनानिमित्त सुरेखाला आशियातील पहिली महिला ड्रायव्हर होण्याचा मान मिळाला होता.

वंदे भारत एक्सप्रेस चोखपणे चालवणाऱ्या सुरेखा यांना कार किंवा बाईक चालवण्याचा अनुभव नाही. त्यामुळे जड वाहने चालवणाऱ्या अनेक महिलांसाठी त्या प्रेरणास्थान बनल्या आहेत. सुरेखा यांनी पुण्यातील डेक्कन क्वीन ते सीएसटी मार्गावर ट्रेन चालवली, जो सर्वात धोकादायक रेल्वे मार्ग (भारतातील सुंदर रेल्वे मार्ग) मानला जातो. मुलींना गाडी चालवता येत नाही असे म्हणणाऱ्यांना सुरेखा यांनी जोरदार चपराक दिली आहे.