नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील भारताचा जीडीपी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट डेटा समोर आला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने आज (29 नोव्हेंबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी 5.4 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. जो 18 महिन्यांतील सर्वात कमी पातळी आहे. हा आकडा रॉयटर्स पोलच्या 6.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे आणि एप्रिल-जून तिमाहीत 6.7 टक्के आणि गेल्या वर्षी याच कालावधीत 8.1 टक्क्यांपर्यंत घसरण दर्शवत आहे. (India GDP declined by 5.4 percent in the second quarter)
भारताचा जीडीपी घसरला असला तरी आपल्याला दिसाला मानता येईल. कारण जुलै आणि सप्टेंबर या तिमाहीत चीनचा जीडीपी 4.6 टक्के होता, त्या तुलनेत आपला दर थोडा जास्त आहे. कृषी क्षेत्राचा एकूण मूल्यवर्धित दर पाहिल्यास 2023-24 च्या जुलै आणि सप्टेंबर या तिमाहीत 3.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हाच दर गेल्या वर्षी 1.7 टक्के होता. परंतु उत्पादन क्षेत्राचा एकूण मूल्यवर्धित दर हा गेल्या वर्षीच्या 14.3 टक्क्यांवरून घसरून 2.2 टक्क्यांवर आला आहे.
हेही वाचा – SC about Prasad : मंदिरांमधील प्रसादाच्या दर्जासाठी हवे नियम, सुप्रीम कोर्ट म्हणते…
अन्नधान्याची वाढती महागाई, उच्च कर्ज, खर्च आणि स्थिर वेतनवाढ ही कारणे जीडीपी घसरण्यामागे असल्याचे अर्थतज्ञांचे मत आहे. किरकोळ अन्न महागाई ऑक्टोबरमध्ये 10.87 टक्क्यांनी वाढली होती. मात्र वरील सर्व घटकांमुळे शहरातील लोकांनी आपला खर्च कमी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे जीडीपीसाठी 60 टक्के एवढे योगदान हा शहरी भाग देतो. मात्र शहरातील लोकांनीच पाठ फिरविल्याने जीडीपवर मोठा परिणाम झाल्याचे जानकारांचे मत आहे.
शेअर बाजारावर परिणाम होणार?
दरम्यान, 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये जीडीपीमध्ये 5.4 टक्क्यांपेक्षा कमी वाढ नोंदवण्यात आली होती. तेव्हा जीडीपी 4.3 टक्के होता. मात्र, या संथ गतीनंतरही भारत हा विकासदराच्या बाबतीत जगातील सर्वात वेगवान देश बनला होता. परंतु सध्याच्या घसरलेल्या विकास दराचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. या विकासदरामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते, असे मानले जात आहे. कारण गुरुवारी सेन्सेक्स 1190 अंकांनी घसरल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते.
हेही वाचा – Thackeray group Vs BJP : देशातील सार्वजनिक संपत्तीचे मालक अदानी, ठाकरे गटाचा हल्लाबोल