दिलासादायक! महाराष्ट्रातील मंकीपॅाक्सच्या 17 संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह

कोरोनानंतर देशभरात मंकीपॉक्सचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात 70 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतामध्येही मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे.

monkeypox first death in india confirmed thrissur 22 year old dead kerala

कोरोनानंतर देशभरात मंकीपॉक्सचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात 70 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतामध्येही मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मंकीपॉक्सचे 17 संशयित निगेटिव्ह आले आहेत. (india maharashtra suspect 17 monkeypox negative)

राज्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी एन.आय व्ही. पुणे आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या 17 पैकी 11 नमुने एन आय व्ही. पुणे येथे तर 6 नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता हे सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.

एन. आय. व्ही पुण्यासह आता मंकीपॉक्स नमुन्यांच्या तपासणीसाठी राज्यात आणखी दोन प्रयोगशाळांचा समावेश झाला आहे. यामध्ये कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) नागपूर यांचा समावेश आहे. राज्यात आता तीन ठिकाणी मंकीपॉक्सच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.

संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो.

मंकीपॉक्सची लक्षणं काय?

  • ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे.
  • ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत.
  • संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते.
  • ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

९ जणांना मंकीपॉक्सची लागण

देशात आतापर्यंत ९ जणांना मंकीपॉक्सची लागण झालेली आहे. यामध्ये राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत ४ रुग्ण आढळले आहेत. तर पाच रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंकीपॉक्सचा संसर्ग आणि परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे.


हेही वाचा – राज्यातील 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; डॉ. विजय सूर्यवंशी MMRDAचे अतिरिक्त आयुक्त