Russia Ukraine Crisis : युक्रेनमध्ये होस्टेलच्या तळमजल्यावर भारतीय विद्यार्थ्यांना कोंबड्यांसारखे कोंबले, विद्यार्थ्यांनी सांगितला थरारक अनुभव

युद्धामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी ‘आपलं महानगर’कडे सांगितला थरारक अनुभव. विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याजवळ असलेल्या जीवनावश्यक वस्तूंवरच त्यांना दिवस काढावे लागत आहेत. भारत सरकारने विशेष विमान पाठवून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या देशात सुखरुप आणावे, अशी कळकळीची याचना विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत.

Indian students stranded in Ukraine share thrilling experience
Russia Ukraine Crisis : युक्रेनमध्ये होस्टेलच्या तळमजल्यावर भारतीय विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबड्यांसारखे कोंबले, विद्यार्थ्यांनी सांगितला थरारक अनुभव

Russia Ukraine Crisis : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतातून असंख्य विद्यार्थी युक्रेनला गेले आहेत. युद्धामुळे विमान फेर्‍या रद्द करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना भारतात येण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. खारकीव शहर तर रशियाने ताब्यात घेतल्याने भारतीय विद्यार्थ्यांना तळमजल्यावर अक्षरश: कोंबड्यांसारखे कोंबून ठेवले असल्याचे एका विद्यार्थिनीने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याजवळ असलेल्या जीवनावश्यक वस्तूंवरच त्यांना दिवस काढावे लागत आहेत. भारत सरकारने विशेष विमान पाठवून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या देशात सुखरुप आणावे, अशी कळकळीची याचना विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत.

युक्रेन आणि रशिया या दोन देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्याने हे दोन्ही देश सोडून इतरत्र जाणार्‍यांच्या रांगा लागल्या आहेत. युक्रेनलाही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला भारतातून अनेक विद्यार्थी गेले आहेत. कोविड काळात या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने भारतात आणण्यात आले होते. परंतु, कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर गेल्या दिवाळीत हे विद्यार्थी युक्रेनला परतले. युद्ध सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह भारतातील त्यांचे पालक कमालीचे धास्तावले आहेत. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर युद्धाच्या दाखवण्यात येणार्‍या बातम्या, बॉम्ब स्फोट आणि तत्सम बाबींमुळे चिंतेत वाढ झाली आहे. नाशिकचे सागर देशमुख यांची पुतणी आदिती आणि आणखी एक नातेवाईक प्रतिक जोंधळे युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. ते खारकीव शहरातील विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. या विद्यापीठात भारतातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेतात.विद्यार्थ्यांचे पालक खासदारांशी संपर्क साधून भारत सरकारने मदत करावी अशी याचना पालक करीत असल्याचे सागर देशमुख यांनी सांगितले.

माझ्यासह अनेक भारतीय युक्रेनमधील खारकीव शहरात शिक्षण घेत आहे. या शहरावर बहुदा रशियाने झेंडा रोवला आहे. त्यामुळे आम्हाला विद्यापीठाच्या वसतिगृहाबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वसतिगृहाच्या तळमजल्यावर आम्हाला अक्षरश: कोंबड्यांसारखे कोंबून ठेवण्यात आले आहे. तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवरच दिवस काढावे लागतील, असे वसतिगृह व्यवस्थापनाने बजावले आहे. अनेकांकडे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहेे. या विद्यार्थ्यांना दुसरे विद्यार्थी मदत करीत आहेत – आदिती देशमुख, युक्रेनमध्ये अडकलेली विद्यार्थिनी

युक्रेनची राजधानी कीवपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावरील चर्निव्हीटसी शहरात मी राहते. युक्रेनमध्ये प्रत्येक रहिवासी सध्या प्रचंड दहशतीखाली आहे. अनेकांनी आपल्या कारने बाहेरचा रस्ता धरला आहे. त्यामुळे रस्ते तुडुंब भरले आहेत. देशात आणीबाणीची परिस्थिती लागू करण्यात आली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू आहेत. ही दुकानेही कोणत्याही क्षणी बंद पडू शकतात या भीतीने येथील रहिवाशांनी खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणी एकच गर्दी केली आहे. विशेषत: मॉल आणि सुपर मार्केटमध्ये किराणा माल खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली आहे. एटीएम केंद्रांबाहेरही कोसो दूरपर्यंत रांगा लागलेल्या दिसतात. वारंवार वाजणार्‍या सायरनमुळे काळजाचा ठोका चुकतो – रिद्धी शर्मा, युक्रेनमध्ये अडकलेली विद्यार्थिनी 

नाशिकचे चार विद्यार्थी अडकले
नाशिक जिल्ह्यातील सागर देशमुख, प्रतिक जोंधळे, अनिकेत आणि रिद्धी शर्मा हे युक्रेनमध्ये युद्धामुळे अडकले आहेत. भारतात येण्याचे मार्ग त्यांना सध्या बंद आहेत.

इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी युक्रेनमध्ये का गेलेत?

वैद्यकीय शिक्षणात युक्रेनचा विश्वभरातून तिसरा क्रमांक लागतो, असे सांगितले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, हरियाणा आदी राज्यांतील हजारो विद्यार्थी युक्रेनला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत.

विद्यार्थ्यांना पोलंडला स्थलांतरीत करण्याच्या हालचाली

युक्रेनपासून पोलंडला विमानाने जायचे झाल्यास अवघ्या चार तासांचा प्रवास आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडला स्थलांतरीत करून तेथून भारतात आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा –  Russia-Ukraine War: युद्धाच्या पहिल्या दिवशी १३७ जणांचा मृत्यू