भारतातील सर्वाधिक महागडी प्रॉपर्टी मुंबईत, ‘या’ उद्योगपतीने खरेदी केला लक्झरी ट्रिप्लेक्स अपार्टमेंट

luxury apartment in mumbai

मुंबई – सपनों का शहर असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वन आरके, वन बीएचकेच्या किंमती कोट्यवधींच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेणं म्हणजे स्वप्नवतच राहिलं आहे. परंतु, भारतातील सर्वांत महागड्या घराची खरेदी मुंबईतच झाली आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात उद्योगपती जे.पी.तपारिया यांनी तब्बल ३६९ कोटी रुपयांना एक लक्झरी ट्रिप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केला आहे. वाळकेश्वर रोडवरील लोढा मलबार टॉवरमध्ये तीन मजले घेण्यात आले आहेत.

दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसर उच्चभ्रू वस्ती समजली जाते. अनेक शासकीय निवासस्थानांसह उद्योगपतींचे बंगले येथे आहेत. त्यामुळे येथे गृहप्रकल्पांच्या किमतीही तोडीस तोड असतात. मोठाली हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये असलेला हा परिसर समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे या परिसरात प्रॉपर्टीच्या किमती चढ्या असतात. अशाच परिसरात वाळकेश्वर रोडवरील लोढा मलबार टॉवरमध्ये गर्भनिरोधक उत्पादक कंपनी फॅमी केअरचे संस्थापक तथा प्रसिद्ध उद्योगपती जे.पी.तपारिया यांनी मालमत्ता खरेदी केली आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असून २०२६ पर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या इमारतीच्या बाजूला राज्यपालांचे निवासस्थान असून दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आणि हँगिंग गार्डन आहे.

या निवासाची वैशिष्ट्ये काय?

  • मलबार हिलमधील ही प्रॉपर्टी १.३६ लाख प्रतिचौरस फूट दराने विकण्यात आली आहे.
  • हे सुपर लक्झरी निवास १.०८ एकरांवर उभारण्यात येत आहे.
  • जून २०२६मध्ये याचं बांधकाम पूर्ण होणार आहे.
  • या मालमत्तेसाठी तपारिया यांनी तब्बल १९.०७ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. या किमतीत मुंबईत १९ फ्लॅट सहज विकत घेता येऊ शकतात.
  • प्रति चौरस फुटाच्या हिशेबाने भारतातील ही मालमत्ता सर्वाधिक महागडी ठरली आहे.

भारतातील आणखी काही महागड्या प्रॉपर्टी

  • काही दिवसांपूर्वी बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी लक्झरी पेंटहाऊस २५२.५० कोटी रुपयांना खरेदी केले होते.
  • भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या पत्नी वसुधा रोहतगी यांनी दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत १६० कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला. हा बंगला २ हजार १०० स्क्वेअर फूट एवढा अवाढव्य विस्तारला आहे. या घरासाठी ६.४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले.