घरमहाराष्ट्रPrakash Ambedkar : मविआच्या पत्रावर आंबेडकरांची सूचक पोस्ट, म्हणाले - 'सामील होणार...

Prakash Ambedkar : मविआच्या पत्रावर आंबेडकरांची सूचक पोस्ट, म्हणाले – ‘सामील होणार पण…’

Subscribe

मुंबई : महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये पार पडली. परंतु, या बैठकीत वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना बैठकीत न घेता एक तास बाहेर बसवून ठेवण्यात आल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळाले. पुंडकर यांनी बैठकीतून काढता पाय घेत प्रसार माध्यमांसमोर येत मविआकडून वंचितचा अपमान करण्यात आल्याचे सांगितले. ज्यानंतल लगेच वंचितला मविआमध्ये अधिकृत स्थान देण्यात आल्याचे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून पोस्ट करण्यात आले. या पत्रावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सूचक पोस्ट केली. आजच्या बैठकीत अपमान झालेला असला तरी मविआच्या पुढच्या बैठकीत वंचित सहभागी होणार असल्याची माहिती आंबेडकरांनी X या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटच्या माध्यमातून दिली आहे. (Indicative post by Prakash Ambedkar on MVA letter)

हेही वाचा… Prakash Ambedkar : महाविकास आघाडीच्या 50% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार; प्रकाश आंबेडकरांचे भाकित

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याच्या पत्रावर नाना पटोले यांना सही करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हे काँग्रेस किंवा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अद्याप वंचितला स्पष्ट केलेले नाही. आघाडीच्या बैठकीत वंचितच्या उपाध्यक्षांना योग्य तो सन्मान देण्यात आला नाही. असे असले तरी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराभव करणे हे वंचितचे प्राथमिक उद्दिष्ट्य असल्याने महाविकास आघाडीच्या पुढील बैठकीत वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार आहे.” त्यामुळे आता आंबेडकरांनी नाना पटोले यांच्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर काँग्रेसकडून काय उत्तर देण्यात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीची आजची बैठक ही उत्तम झाली असून अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली. तर मविआची पुढील बैठक ही लगेच शुक्रवारी 2, फेब्रुवारीला होणार आहे. या बैठकीला आता वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार की या पक्षातील नेते उपस्थित राहणार, हा महत्त्वाचा विषय आहे. पण दुसरीकडे मात्र, आंबेडकर स्वतः मविआत मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहे. त्यामुळे आंबेडकरांना नेमकी कोणती राजकीय खेळी करायची आहे, असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झालेला आहे. परंतु, आता आंबेडकरांच्या या प्रश्नाबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -