घरमहाराष्ट्रसेना नेते गीते, कदम यांची हकालपट्टी अटळ

सेना नेते गीते, कदम यांची हकालपट्टी अटळ

Subscribe

पक्षशिस्तीचा भंग करत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्याबाबत एकमत

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम या दोघांवर लवकरच पक्षशिस्तीचा भंग करत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टीची कारवाई करण्यात येणार आहे. या दोघांवर होणारी ही कारवाई १६ वर्षांनंतरची सगळ्यात मोठी पक्षीय कारवाई असणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी २१ सप्टेंबर रोजी अलिबागमध्ये जाहीर सभेत भाषण करताना महाविकास आघाडी सरकारचे निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह सरकारवरही जोरदार टीका केली होती. त्यामुळे मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री यांची स्थिती अवघडल्यासारखी झाली होती. केंद्रीय मंत्री गीते यांना या कार्यक्रमाला येण्यासाठी गळ घालणार्‍या अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना वर्षावर बोलावून मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला होता. पक्षशिस्तीत राहणे जमत नसेल तर तिन्ही आमदारांनी (महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले) राजीनामे दिले तरी हरकत नाही असा सज्जड दमच दिला होता. महेंद्र दळवी आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात जिल्हा परिषदेवरून तणाव असल्याने दळवी, गीते यांच्या संतापाला खतपाणी घालत असतात.

- Advertisement -

अनंत गीते या एका नेत्याने मुख्यमंत्र्यांना झटका देण्याचा केलेला प्रयत्न काहीसा शिवसेनेने संयमाने घेतला. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे चाणक्य परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामांची माहिती सविस्तरपणे भाजपच्या किरीट सोमय्या यांना पुरवली. माजी खासदार किरीट सोमय्या हे व्यक्तिगत पातळीवर ठाकरे यांना त्रास देत असताना अनिल परब यांच्या बाबतची माहिती विरोधकांना देऊन पक्षविरोधी कारवाई केली आहे. यामुळे सेनेतील तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. गीते, कदम यांसारख्या नेत्यांचा धीर चेपून पक्षविरोधी कारवायांना जोर मिळाल्यास शिवसेनेची काँग्रेस होऊ शकते, असा सूर मातोश्रीच्या थिंकटँकमध्ये काढण्यात येत आहे.

अनंत गीते, रामदास कदम प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत संघटना पातळीवर महत्वपूर्ण काम केलेल्या अन्य दोन नेत्यांचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून आलेल्या अहवालानंतरच गीते आणि कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येणार आहे. २००५ साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हा राणे यांना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे विरोधी कारवाईची किंमत चुकवावी लागली होती. आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत. गीते, कदम यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेत बजबजपुरी माजेल या भितीने हे नेते जरी ज्येष्ठ असले तरी त्यांची हकालपट्टी अटळ समजण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -