Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर उत्तर महाराष्ट्र फेरीवाले, मजुरांमध्येही गुन्हेगारांची घुसखोरी

फेरीवाले, मजुरांमध्येही गुन्हेगारांची घुसखोरी

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्याने लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले, तरी गुन्हेगारीचा राज्यभरातील आलेख अद्यापही चढाच आहे. याला कारणेही अनेक आहेत. सराईत गुन्हेगार खून, दरोडे, घरफोड्या करुन पोलिसांपासून बचाव करण्यासाठी परजिल्ह्यात आसरा घेत असल्याचे दिसून आले आहे. हे गुन्हेगार गजरे विक्री, हातमजुरी करून स्वत:ची ओळख लपवत असल्याचे आजवर अनेकदा पोलीस तपासात समोर आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सराईत गुन्हेगार नाशिक शहरात गजरे विक्री करत होता. पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या आणि अशा गुन्हेगारांच्या कथा समोर येऊ लागल्या. रिक्षावाले, सावकारी अशा क्षेत्रांमध्ये गुन्हेगारांची घुसखोरी सर्वश्रूतच होती, पण आता हातमजूर, गजरेवाले, फेरीवाले यांच्याही अज्ञानाचा फायदा घेत काही गुन्हेगार त्यांच्यात मिसळून स्वत:ची ओळख लपवत आहेत, ज्यामुळे पोलीस तपासात अनेक आव्हाने उभी ठाकत आहेत.

कळंब येथील दरोडा अन् हत्येच्या घटनेनंतर परजिल्ह्यातील गुन्हेगार नाशकात आश्रयाला येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. ही घटना नेमकी दरोड्याच्या प्रयत्नातून झाली की अन्य कशामुळे हे उघड होत नव्हते. यामुळे या प्रकरणाचे पोलिसांपुढे आव्हान होते. घटनास्थळी कोणताही पुरावाच नव्हता. अखेर समांतर तपासातून या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार नाशिकला पळून गेल्याचे समजले. यातून तपासाची चक्रं फिरू लागली.
मूळात उस्मानाबाद येथील अनेक लोक नाशिक शहरात येऊन सिग्नल तसेच वर्दळीच्या चौकांमध्ये गजरा आणि कचरा संकलनाच्या पिशव्या विक्रीचा व्यवसाय करताहेत. त्यामुळे आता या लोकांमध्ये त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलत काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यात घुसखोरी केल्याचे उघड होत आहे.
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गुन्हेगार सुधार योजना सुरु केली आहे. ही बाब नाशिककरांसाठी सुखद धक्का देणारी असली तरी या योजनेतून गुन्हेगारांच्या तुलनेत किती गुन्हेगारांनी सरळ मार्ग स्वीकराला. उर्वरित गुन्हेगार सुधारण्याऐवजी आणखीच बिघडत असल्याचे आजवरच्या घटनांवरुन समोर येत आहे. नाशिक शहरात नोकरी व व्यवसाय उपलब्ध न झाल्याने अनेक तरुण रिक्षा व्यवसायाकडे वळतात. अनेकजण प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. मात्र, आता रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक लोकांनी प्रवेश केल्याचे दिसते. त्यांच्याकडून प्रवाशांची लुटमार करण्यासह प्रामाणिक व कधीही कोणत्याही व्यसनांच्या आहारी न गेलेल्या रिक्षाचालकांना धमकावण्याच्या घटना समोर येत आहेत. रिक्षाचालकांमधील या गुन्हेगारी घटना नाशिककरांसाठी नवीन नाहीत. ही बाब पोलिसांच्या नगजरेतूनही सुटली नाही. त्यामुळेच पोलिसांनी सध्या रिक्षावाल्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून या व्यसायात घुसखोरी करून पाहणार्‍यांना शासित करता येईल. दरम्यान, आयुक्तांनी सुरू केलेली गुन्हेगार सुधार योजना शहरातील गुन्हेगारांना सुधारण्यासाठी महत्त्वाची ठरूही शकेल, परंतु अशाप्रकारे शहरात घुसखोरी करून वास्तव्य करणार्‍या गुन्हेगार्‍यांना पोलिसांकडून कशाप्रकारे सुधारता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. जेणेकरून शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी होऊ शकेल.

परजिल्ह्यातील तडीपार गुन्हेगारांचा नाशकात आश्रय

- Advertisement -

खून, दरोडे, बलात्कार आदी गंभीर स्वरुपाच्या खुन्यातील सराईत गुन्हेगारांना औरंगाबाद, पुणे, ठाणे व मुंबई येथील पोलीस दोन वर्षांसाठी तडीपार करतात. त्यामुळे हे सराईत गुन्हेगार नाशिक शहर व जिल्ह्यात आश्रयास येत आहेत. तडीपार सराईत गुन्हेगार नाशिकमध्ये आल्यावर ते स्थानिक गुन्हेगारांशी हातमिळवणी करत आहेत. त्यातून नाशिक शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ होत आहे. परपुरुषांशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा काटा काढण्यासाठी मुंबई व ठाण्यातील सराईत गुन्हेगारांना लाखो रुपयांची सुपारी दिली होती. या गुन्हेगारांनी महिलेला मुंबई-आग्रा महामार्ग मार्गे मालेगाव तालुक्यात आणत खून केला. चेहरा ओळखू येऊ नये, यासाठी महिलेच्या चेहर्‍यावरही वार करण्यात आले होते. पोलिसांनी तपास करत गुन्हेगारांनी मुंबईतून अटक केली. दुसर्‍या घटनेत, खून व दरोडा टाकणार्‍या अट्टल गुन्हेगारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. तो गुन्हेगार येवल्यात नाव बदलून राहत होता. मोक्का कारवाईत तो नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत होता. दरम्यान, त्याने तुरुंगातच टोळी तयार केली होती. नागपूरहून नाशिकला न्यायालयात सुनावणीसाठी आणताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. त्याने महाराष्ट्र विविध ठिकाणी खून, दरोडे टाकल्याचे उघडकीस आले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन महिने पाळत ठेवून त्याला सापळा रचून अटक केली. आता तो शिक्षा भोगत आहे.

- Advertisement -