घरताज्या घडामोडीमुंबईत एका क्लिकवर मिळणार इमारतीच्या परवानग्या, सेवा-सुविधांची माहिती

मुंबईत एका क्लिकवर मिळणार इमारतीच्या परवानग्या, सेवा-सुविधांची माहिती

Subscribe

मुंबई महापालिकेने शहरातील इमारतींना दिलेल्या विविध परवानग्या व नागरी सेवा-सुविधांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणाली एकाच मुख्य क्रमांकाखाली जोडण्याचे काम पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने शहरातील इमारतींना दिलेल्या विविध परवानग्या व नागरी सेवा-सुविधांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणाली एकाच मुख्य क्रमांकाखाली जोडण्याचे काम पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्याच्या प्रशासकीय पातळीवरील पहिल्या टप्प्याचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते सोमवारी पालिका मुख्यालयात करण्यात आला. (Information about building permits services and facilities in Mumbai will be available in one click)

पालिकेच्या या सर्व खात्यांचा कारभार यापूर्वीच ऑनलाईन झालेला आहे. विविध परवानग्या देताना व सेवा-सुविधा पुरवताना, एकच इमारत ही महापालिकेच्या विविध खात्यांच्या संगणकीय प्रणालीत त्या-त्या खात्याच्या स्वतंत्र क्रमांकाने नोंदवली जाते / संदर्भित केली जाते. स्वाभाविकच, नागरिकांना प्रत्येक खात्याच्या स्वतंत्र प्रणालीमार्फत परवानग्यांची माहिती प्राप्त करताना त्या-त्या विभागाचा संदर्भ क्रमांक माहीत असणे आवश्यक ठरते. म्हणजेच एकाच इमारतीचे विविध परवानग्या व सेवांचे संदर्भ क्रमांक त्या-त्या इमारतीतील रहिवाशांना/ गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱयांना संदर्भित करावे लागतात.

- Advertisement -

डिजीटल युगात प्रत्येक गोष्टीसाठी तयार होणारा ओळख क्रमांक आणि पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी होणारी नागरिकांची कसरत लक्षात घेता, मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या सोयीसाठी मायबीएमसी बिल्डिंग आयडी म्हणजेच ‘इमारत ओळख क्रमांक’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. थोडक्यात, एकाच इमारतीचे विविध खात्यातील परवानगी व सेवांविषयक संदर्भ क्रमांक त्या इमारतीच्या ‘इमारत ओळख क्रमांका’शी जोडण्याकरिता मायबीएमसी बिल्डिंग आयडी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

इमारत ओळख क्रमांक प्रकल्प कशासाठी?

- Advertisement -

मुंबई महापालिका क्षेत्रात कोणतीही इमारत उभी करण्याआधी महापालिकेकडून इमारत प्रस्ताव मंजुरी देण्यात येते. तेव्हापासून ते प्रत्यक्ष वापर होत असताना विविध परवानग्या व सेवा-सुविधांच्या निमित्ताने महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांशी प्रत्येक इमारतीचा संबंध येतो. स्वाभाविकच या विविध खात्याच्या परवानग्या व सेवांचा विविध प्रशासकीय संदर्भ क्रमांक देखील एकाच इमारतीशी जोडला जातो. जसे की इमारत प्रस्ताव, पाणीपुरवठा, करनिर्धारण, दुकाने व आस्थापना इत्यादी खाती यामध्ये मोडतात.

इमारत बांधकामापासून ते त्यातील वापराबाबत देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या, कागदपत्रे, सेवा-सुविधा यांचा यामध्ये समावेश असतो. व्यापार/आरोग्य अनुज्ञापन पत्र, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, अनधिकृत बांधकाम/ मोडकळीस आलेल्या इमारत कारवाई इत्यादी सर्व प्रक्रिया महापालिकेमार्फत पार पाडण्यात येतात.

इमारत ओळख क्रमांक प्रकल्पाचे स्वरुप

मुंबई महापालिकेने मुंबईतील प्रत्येक इमारतीला स्वतंत्र ओळख क्रमांक अर्थात बिल्डिंग आयडी देण्याची कार्यवाही काही वर्षांपूर्वीच सुरु केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आजघडीला सुमारे २ लाख ३३ हजार मालमत्ता कर पात्र इमारती आहेत. मालमता कर संकलनाच्या दृष्टीने यातील प्रत्येक इमारतीला १५ अंकी क्रमांक देण्यात आला आहे. हा प्रकल्प राबवित असताना प्रशासनाच्या निदर्शनास आले की, ज्याप्रमाणे मालमत्ता कर संकलनासाठी संदर्भ क्रमांक दिला आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक इमारतीला मिळणाऱया इतर परवानग्या व सेवा-सुविधांचे संदर्भ क्रमांक देखील एकमेकांशी जोडणे शक्य आहे. या विचारातूनच प्रत्येक इमारतीला एकच मुख्य ओळख क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने प्रत्येक करपात्र इमारतीच्या कर देयकावरील नमूद १५ अंकी लेखा क्रमांक हा त्या इमारतीचा ‘इमारत ओळख क्रमांक’ आहे. तर उर्वरित खात्यांचे संदर्भ क्रमांक या मुख्य क्रमांकाच्या छत्राखाली जोडण्यात येत आहेत.

इमारत ओळख क्रमांक प्रकल्पाचा वापर नागरिकांनी कसा करावा?

इमारत ओळख क्रमांक प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडली गेलेली परवानग्यांची व सेवांची माहिती नागरिकांना आंतरजाल जोडणी (वेबलिंक) द्वारे पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या ‘ मायबीएमसी मोबाईल ऍप’ वरुन देखील ही सुविधा अनुभवता येईल. संगणकासह लॅपटॉप, स्मार्टफोन व टॅबलेट वरुन देखील त्याचा नागरिकांना सहजपणे वापर करता येणार आहे. त्यामुळे घरी अथवा कार्यालयातच नव्हे तर प्रवासात किंवा अन्यत्र असतानाही नागरिकांना ही सुविधा अनुभवता येईल.

‘मायबीएमसी बिल्डिंग आयडी’ प्रणालीमध्ये नागरिकांना गुगल मॅपसदृश्य सुविधेचा अनेक पद्धतीने उपयोग करुन आपली इमारत उपग्रहीय नकाशावर शोधता येईल. त्यावर क्लिक केल्यावर पालिकेच्या १२ विभागांची विशिष्ट इमारतीच्या संदर्भातील मूलभूत माहिती दिसणार आहे. उदाहरणार्थ,पालिकेच्या करनिर्धारण खात्यात आपल्या इमारतीच्या वापरातील एकूण सदनिका, गाळे, मजले, आपल्या इमारतीत असलेले व्यापार/आरोग्य अनुज्ञापन पत्रे, दुकान व आस्थापना नोंदणी, जलजोडणी क्रमांक, त्यांचा वापर, इमारत प्रस्ताव विभागामार्फत देण्यात आलेल्या मंजूरी, नकाशे, अनधिकृत/ मोडकळीस आलेल्या बांधकामाबाबत सुरू असलेली कारवाई इत्यादीबाबतची मूलभूत माहिती उपलब्ध होऊ शकेल. एवढेच नव्हे तर, या प्रणालीद्वारे नागरिक विविध परवानगी अर्ज/ नूतनीकरण तसेच देयकांचा भरणा देखील करु शकणार आहेत.

इमारत ओळख क्रमांक प्रकल्पाचे मुंबईकर नागरिकांना होणारे फायदे

  • सदर प्रणालीची माहिती अद्ययावत व रियल टाईम आणि विश्वासार्ह असेल.
  • घर/ इमारत मालक, गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन यांना या माहितीमुळे इमारती संदर्भातील कामकाजात सहजता येईल.
  • व्यापार संकूल/ दुकाने/ सिनेमागृह/ उपहारगृह यामधील नागरी सेवा-सुविधांचा लाभ घेताना अशा इमारती/ दुकाने यांची सुरक्षा व कायदेशीर परवानग्या याबाबतची माहिती सहजपणे उपलब्ध होईल.
  • व्यापार/ व्यावसायिकांना त्यांच्या वैध परवानग्या प्रदर्शित करुन व्यवसाय वाढविण्याची संधी उपलब्ध होईल.
  • नागरिक/ व्यावसायिक त्यांच्या जागा वापराबाबत आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्याकरिता प्रोत्साहित होतील.
  • घर/दुकाने खरेदीचा व्यवहार करताना बांधकाच्या अधिकृततेबाबतची माहिती सहज उपलब्ध होईल.
  • विविध खात्यांची माहिती एकत्रित उपलब्ध झाल्याने, एखादी परवानगी घेताना/देताना अन्य खात्यांचे अभिप्राय प्राप्त करण्यासाठीचा प्रशासकीय कामकाजातील वेळ वाचेल.
  • परिणामी प्रशासकीय कार्यवाही गतिमान होईल.

हेही वाचा – मोपलवारांकडे एमएसआरडीसीचा अतिरिक्त कार्यभार, एकाचवेळी दोन पदे सांभाळणारे पहिले अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -