संपकरींवर कारवाईला सुरूवात; जिल्हाधिकार्‍यांनी एक हजार कर्मचार्‍यांना बजावल्या नोटीसा

नाशिक : नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या वतीने चार दिवसांपासून संप पुकारण्यात आला आहे. अखेर प्रशासनाने संपावर गेलेल्या कर्मचारयांवर कारवाईला सुरूवात केली असून नाशिक महसूल विभागातील १०५६ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिली आहे. तर पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करत असल्याचे मंगळवारी जाहीर केले होते. मात्र निर्णय होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याची भूमिका सरकारी कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्व सामान्य जनतेची शासकीय कार्यालयातील कामे अडकून पडल्याने अनेक नागरिक शासकीय कार्यालयात फेर्‍या मारत आहेत.

संपामफळे सर्वसामान्यांची कामे रखडली आहेत नागरिकांनाही रिकाम्या हातीच परतावे लागत असल्याने आता जिल्हाधिकार्‍यांनी या सर्व कर्मचार्‍यांना संपामध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरून नोटीसा बजावल्या आहेत. त्यामध्ये शासकीय सेवेमध्ये आपण आहात. असे असताना शासन आदेशाचे पालन न करता आपण संपामध्ये सहभागी झाला आहात, तर आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये? अशी थेट विचारण्यात जिल्हाधिकार्‍यांनी नोटीसीद्वारे केली आहे. विशेष म्हणजे कर्मचार्‍यांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून नोटीसा हाती मिळताच पुढील 24 तासांमध्ये लेखी खुलासा सादर करण्याबाबतही आदेशित केले आहे.

आकडेवारी 
  • एकूण अधिकारी कर्मचारी – १२४१
  • संपामध्ये सहभागी कर्मचारी – १०७१
  • रजेवर असणारे कर्मचारी – ३६
  • कर्तव्यावर हजर अधिकारी – १३४
  • कर्तव्यावर हजर कर्मचारी – ०५