नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही डबलडेकर उड्डाणपूल, त्यावर धावणार मेट्रो

नाशिकमध्ये १२६३ कोटींच्या ६ प्रकल्पांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि ४१४ कोटींच्या ६ प्रकल्पांचे कोनशिला अनावरण

Nitin Gadkari

द्वारका सर्कल ते नाशिकरोड या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मार्गावर नागपूरप्रमाणेच डबलडेकर उड्डाणपूल तयार करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाशिकमध्ये केली. खाली चार पदरी हायवे, त्यावर चार पदरी उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रोचा मार्ग असा हा प्रकल्प आहे. त्यासाठी १६०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, महामार्ग प्राधिकरण आणि मेट्रो यांच्या संयुक्त विद्ममाने हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील १ हजार २६३ कोटींच्या ६ विविध प्रकल्पांचं लोकार्पण केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिकमधील सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. ४१४ कोटी रुपये खर्चाच्या ६ प्रकल्पांच्या कोनशिलेचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र्यांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आपण कालच या प्रकल्पाबाबत चर्चा करत निर्णय घेतला असल्याचं गडकरींनी सांगितलं. नाशिकमध्ये नाशिकरोड ते द्वारका हा एलिव्हेटेड मार्ग असून, त्यावर २१०० कोटी रुपये खर्चाचा मेट्रो प्रकल्प मंजूर झालेला आहे. गंगापूर ते नाशिकरोड आणि गंगापूर ते मुंबई नाका हा मेट्रोचा मार्ग आहे. त्यातील गंगापूर ते नाशिकरोड या मार्गावर डबल डेकर उड्डाणपूलाची गरज व्यक्त केली जात होती. त्यानुसार या प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा गडकरींनी केली. या डबल डेकर उड्डाणपूलाचं डिझाईन तयार करायला सांगितलं आहे. या प्रकल्पामुळे द्वारका सर्कल भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी संपेल. अपघात टळतील. मेट्रोसोबत हा प्रकल्प साकारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. पुढील २ वर्षांत या प्रस्तावित पुलाच्या उद्घाटनासाठी आपण येऊ, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

वडपे ते गोंदे काँक्रिटीकरण

ठाणे ते वडपे हा मार्ग ८ पदरी करतो आहोत. याशिवाय नाशिक ते गोंदे ते वडपे हा ४ पदरी ९९ किलोमीटरच्या मार्गाला लवकरच ६ पदरीसाठी मंजुरी दिली जाईल. पिंपरी सदो ते गोंदे हा मार्ग समृद्धी मार्गाला जोडला जाईल, त्यासाठी १ हजार कोटींचा खर्च येणार आहे. याशिवाय गोंदे ते वडपे मार्गाच्या काँक्रिटीकरणाचा आदेश दिला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या सर्व कामांमुळे पुढील दोन वर्षांत मुंबई-नाशिक प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.