श्वसनासंबंधित २० आजारांवर मोफत उपचाराच्या रुग्णालयांना सूचना

पैसे घेतल्यास पाचपट दंडाची तरतूद

health minister rajesh tope

श्वसनासंबंधित 20 आजारांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार करावे. उपचारासाठी पैसे घेतले तर पाचपट दंड लावण्याचा, परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत सार्वजनिक गणपती, गणपती मिरवणुका याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच, कोरोनाविरोधात लढा आणि अडचणी यावरही चर्चा झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा झाली.

सार्वजनिक गणपती कमीत कमी बसतील त्यावर लक्ष द्यावे, आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीवर मर्यादा हवी, सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा व्हावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती, समाज प्रबोधन यावर भर द्यावा. राज्य सरकारने लोकहिताचे जे निर्णय घेतले आहेत त्याची माहिती गणेशोत्सव मंडळांनी द्यावी, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांनी सॅनिटाइझ करायला हवे. मोहरमही सर्व नियम पाळून केला पाहिजे.

शेवटच्या क्षणी आलेल्या रुग्णांचे प्रमाण मृतांमध्ये जास्त आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. जम्बो फॅसिलिटी खर्चिक आहे. आपल्याकडे आहे त्या ठिकाणी सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

संख्या नियंत्रणात आणण्यासाठी संपर्क शोधणे महत्त्वाचे आहे. हे प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टेस्टिंग वाढवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मृत्यूदर 1 टक्क्याच्या आत आणण्याचा आमचा हेतू आहे. सगळ्यांनी मिशन मोडवर काम करण्याचे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना केले आहे.