मुंबई – संत रामदास यांना राज्यात भिक्षा मागताना पाहून शिवाजी महाराज व्यथित झाले आणि त्यांनी संपूर्ण राज्य हे संत रामदासांच्या चरणी अर्पण केल्याची कथा सदगुरु जग्गी वासूदेव यांनी सांगितली आहे. एवढेच नाही तर संत रामदासांनी दिलेल्या त्यांच्या अंगावरील भगव्या कपड्यालाच छत्रपती शिवाजी महाराजांनी झेंडा म्हणून स्वीकारले असल्याचा दावा जग्गी वासूदेव यांनी त्यांच्या कथा वाचनात केला आहे. यावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जग्गी वासूदेव यांच्या या कथेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

जग्गी वासूदेव यांनी संत रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी आणि हिणकस कथा सांगून महाराजांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी आव्हाडांनी ट्विटद्वारे केली आहे.
काय आहे प्रकरण
सदगुरु जग्गी वासूदेव ( यांनी त्यांच्या Sadguru या यूट्युब चॅनलवर एक अॅनिमेशनसह कथावाचन केले आहे. महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. Why Chhatrapati Shivaji Maharaj Still Lives in People’s Hearts असे शिर्षक असलेल्या या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराज आणि संत रामदास यांची गुरु-शिष्याची कथा जग्गी वासूदेव यांनी सांगितली आहे. त्यात संत रामदास हे दारोदार भिक्षा मागत असल्याचे पाहून शिवाजी महाराज व्यथित होतात, असे जग्गी वासूदेव यांनी सांगितले आहे. आपले गुरु हे दारोदार भिक्षा मागत आहेत पाहून शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य हे संत रामदासांच्या चरणी अर्पण केले, असल्याचे या कथेत जग्गी वासूदेव सांगतात.
त्यासोबतच संत रामदास शिवाजी महाराजांच्या हातात भिक्षापात्र देतात आणि दोघेही राज्यात भिक्षा मागतात. त्यानंतर संत रामदास हे शिवाजी महाराजांना सांगतात की यापुढे हे राज्य तुमचे नाही, शिवाजी राजांचे नाही असे लक्षात घेऊन राज्य करा.

जग्गी वासूदेव यांनी सांगितलेल्या कथेनुसार, संत रामदास आपल्या अंगावरील वस्त्र शिवाजी महाराजांना देतात आणि सांगतात, की आजपासून हाच तुमचा भगवा ध्वज आहे.
जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 6, 2023
जग्गी वासूदेव यांच्या या कथावाचनावर जितेंद्र आव्हाडांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती प्रसारित करुन छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी ट्विट द्वारे दिला आहे.
महाराष्ट्र सरकारने जग्गी वासूदेव यांच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आव्हाडांनी केली आहे, अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला आहे.