शरद पवारांबाबत सभागृहात अवमानजनक वक्तव्य, राष्ट्रावादीचे आमदार आक्रमक

ajit pawar

मुंबई – भाजपा आमदार राम सातपुते यांनी शरद पवारांचा अवमानजनक उल्लेख केल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. याप्रकरणी महाविकास आघाडीने राम सातपुते यांची माफी मागण्याची मागणी केली. राष्ट्रावादीचे आमदार आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज रखडले गेले. अखेर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन राम सातपुतेंच्या वतीने माफी मागितली आणि प्रकरण निवळले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड चर्चा करत होते. त्यावेळी त्यांनी आमदार राम सातपुते यांच्याबाबत विधान केले. यामुळे संतापलेल्या राम सातपुते यांनी जितेंद्र आव्हाडांना निशाण्यावर घेतलं. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केलं. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली. गोंधळ वाढल्याने तालिका अध्यक्ष योगेश सागर यांना काहीकाळ सभागृह तहकूब करावं लागलं.

सभागृहातील चर्चा तपासली जाईल, रेकॉर्डवर काही चुकीचं आलं तर ते काढलं जाईल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. मात्र, तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेत घोषणाबाजी सुरूच ठेवली. शरद पवारांची माफी मागितल्याशिवाय सभागृह सुरू न करण्याची भूमिकाच महाविकास आघाडीने घेतली.

दरम्यान, सभागृहात उपस्थित नसलेले विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आले. यावेळी अजित पवार यांनीही शरद पवारांच्या अवमानजनक वक्तव्याविरोधात भूमिका घेतली. राम सातपुते यांनी माफी मागून विषय संपवावा अशी मागणी केली. एखाद्या नेत्याविषयी कोणीही अवमानजनक वक्तव्य करेल आणि मग तुम्ही पटलावरून ते काढून टाकणार हे योग्य नाही. असा नवा पायंडा पाडू नका अशी विनंती अजित पवारांनी केली.

अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी माफी मागितली. आशिष शेलारांनी माफी मागितल्यानंतर राम सातपुते यांनीही दिलगिरी व्यक्त केली.