घरCORONA UPDATEइथे फक्त वाद नसतात; हिंदु-मुस्लीम बंधुभावाची 'ही' जगावेगळी घटना!

इथे फक्त वाद नसतात; हिंदु-मुस्लीम बंधुभावाची ‘ही’ जगावेगळी घटना!

Subscribe

फाळणीपासून भारतात हिंदू-मुस्लीम या दोन महत्त्वाच्या समाजघटकांमध्ये कायम वादच असल्याचं चित्र उभं केलं गेलं. पण या देशात हे दोन्ही समाजघटक गेल्या कित्येक दशकांपासून गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. अजूनही नांदत आहेत. अजूनही त्यांच्या मनात एकमेकांसाठी तितकंच प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे संबंध आहेत. आणि हे सिद्ध करणाऱ्या अनेक घटना वारंवार घडत असतात. सातत्याने घडत असतात. पण त्या कित्येकदा समोर येतच नाहीत. अशीच एक घटना महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. एका हिंदू व्यक्तीचा झालेला मृत्यू आणि त्याच्या मृतदेहावरच्या अंत्यसंस्काराची ही कहाणी आहे.

ही घटना घडली सोमवारी संध्याकाळच्या सुमारास. अकोल्याच्या सरकारी रुग्णालयात संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एक फोन आला. शहरात राहणारी एक ७८ वर्षीय व्यक्ती घरातच कोसळली आहे. त्यानंतर तातडीने त्या व्यक्तीच्या घरी अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आली. पण रुग्णालयात उपचारांदरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू हार्ट अटॅक अर्थात ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला होता. रुग्णालयाने यासंदर्भात त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना, घरच्यांना कळवलं. पण धक्कादायक प्रकार घडला. त्या व्यक्तीच्या मुलांनीच त्यांचा मृतदेह घ्यायला नकार दिला. कारण?

- Advertisement -

सदर व्यक्तीच्या पत्नीवर म्हणजेच या मुलांच्या आईवर शहरातल्या सरकारी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू देखील कोरोनामुळेच झाला असावा असा संशय येऊन या मुलांनी आपल्याच जन्मदात्या वडिलांचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला. हा सगळा प्रकार शहरातली एक प्रसिद्ध मुस्लिम सामाजिक संस्था असलेल्या अकोला कुची मेमन जमातला समजला. त्यांनी मुळात अशा प्रकारे अंत्यसंस्कारांच्या प्रतिक्षेत असलेल्या, नातेवाईकांनी नाकारलेल्या किंवा त्यांना ते शक्य नसलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कामच हाती घेतलं आहे. हा प्रकार समजल्यानंतर या संघटनेच्या काही मुस्लीम सदस्यांनी लागलीच सरकारी रुग्णालयात धाव घेतली.

मुलांनीच वाऱ्यावर सोडलेल्या त्या मृतदेहाला या मुस्लीम सदस्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार केले. मुस्लीम व्यक्तींनी हिंदू व्यक्तीच्या मृतदेहावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची ही एक दुर्लभ घटना होती. या संघटनेचे प्रमुख जावेद झकारिया यांनी एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘जेव्हा अकोल्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं, की अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे. आजपर्यंत आम्ही असे ६० अंत्यसंस्कार केले आहेत. त्यातले २१ कोरोना रुग्ण होते. आणि त्यातले ५ हिंदू होते’.

- Advertisement -

कायम हिंदू-मुस्लीम यांच्यात वाद असल्याचं सांगून, त्यांच्यात भांडणं लावून त्यावर आपल्या फायद्याची पोळी शेकणाऱ्यांसाठी अकोल्यातल्या या संघटनेचं काम ही एक सणसणीत चपराकच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -