आंतरराष्ट्रीय रेल्वे क्रॉसिंग डे : रेल्वे क्रॉसिंग सुरक्षिततेबाबत जागरूकतेसाठी जागतिक उपक्रम

सुरक्षितता वाढवून अपघातांची संख्या कमी करण्यासाठी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी या दिनामुळे सहभागी देशांना मिळते. लेव्हल क्रॉसिंगच्या आसपासच्या धोक्यांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी रेल्वे उद्योगाचे प्रतिनिधी, रस्ते वाहतूक अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि जगभरातील इतर अनेक इच्छुक संस्था या अंतर्गत काम करतात.

नितीन सप्रे

शनिवार 11 डिसेंबर, 1993…ती संध्याकाळ आणि रात्री उशिरा पर्यंत पुण्यातल्या केईम रुग्णालयाच्या शवागाराबाहेर उभं राहून खऱ्या अर्थानं समजलेला हतबलता, अगतिकता या शब्दांचा अर्थ आजीवन विसरता येणार नाही. शनिवार बाकी सर्वांसाठी सुटीचा दिवस. संध्याकाळची वेळ माझी ड्यूटी संपत आलेली रीलिव्हर (सोडव्या) ची वाट बघत असतानाच अचानक आकाशवाणी पुणे केंद्राला लागूनच असलेल्या शाळेचे शिक्षक ड्युटी रूममध्ये माझ्याकडे आले. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी छोट्या सहलीसाठी दोन बसेस मधून गेले होते. आणि परतीच्या वाटेवर त्यापैकी एक बस उरळी कांचन नजिक मानव रहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पुढे गेली आणि मागच्या बसला क्रॉसिंग पार करण्याआधीच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेसची इतकी जोरात धडक बसली की ती धातूच्या चेंडू प्रमाणे रेल्वे रुळावर सुमारे 250 फूट घरंगळत गेली. अंगावर काटे आणणाऱ्या हा अपघात, सहलीच्या गमती घरी पोहोचून कधी एकदा आई – वडील, मित्र – मैत्रिणींना सांगतो असं चित्र मनात रंगवित, किलबिल करत असलेल्या 30 हून अधिक चिमण्या पाखरांना निचेष्ट अवस्थेत घरी पोहोचण्यास कारणीभूत ठरला.

कितीही हृदयद्रावक असली तरी ही बातमी त्यांच्या घरट्यां पर्यंत तातडीनं पोहोचणं अनिवार्यच होतं. या कामी आकाशवाणी कडून काही मदत होऊ शकेल का म्हणून ते शिक्षक माझ्यापुढे बसले होते. पुणे केंद्राच्या बातम्या सकाळीच प्रसारित होत असत पण परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन असा काही प्रघात नसताना सुद्धा, मी लगेचच आकाशवाणी पुणे आणि विविधभारती अशा दोन्ही वरून सुरू असलेल्या कार्यक्रमा दरम्यान हे वृत्त प्रथम प्रसारित केलं आणि त्यानंतर आणखी काही वेळा ते दिलं. म्हणता म्हणता ही बातमी वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली. ही झाली पार्श्वभूमी. यासंदर्भात अधिक पुढे कधी तरी.

आंतरराष्ट्रीय समपार दिवस

आज हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे आज आंतरराष्ट्रीय समपार दिवस (International Level Crossing Day) आहे. लेव्हल क्रॉसिंग सुरक्षितते संदर्भात जनतेला अधिकाधिक जागरूक करण्यासाठी हा जागतिक उपक्रम घेतला जातो. दरवर्षी 9 जून रोजी या दिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जगभरातील रेल्वे संघटनांच्या पाठिंब्यानं, इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वे (यूआयसी) साल 2009 पासून या मोहिमेचं नेतृत्व करते. साधारणतः 50 देश या (ILCAD) वार्षिक मोहिमेत सहभागी होतात.

सुरक्षितता वाढवून अपघातांची संख्या कमी करण्यासाठी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी या दिनामुळे सहभागी देशांना मिळते. लेव्हल क्रॉसिंगच्या आसपासच्या धोक्यांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी रेल्वे उद्योगाचे प्रतिनिधी, रस्ते वाहतूक अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि जगभरातील इतर अनेक इच्छुक संस्था या अंतर्गत काम करतात.

नेटवर्क रेल आणि UIC यांनी संयुक्तपणे 2021 साली, ILCAD लॉन्च कॉन्फरन्स आयोजित केली होती. यॉर्क इथल्या नॅशनल रेल्वे म्युझियम मध्ये ही परिषद घेण्यात येणार होती, मात्र कोविड-19 महामारीमुळे ती ऑनलाइन घेण्यात आली. या परिषदेत रेल्वे असलेल्या प्रत्येक खंडाच प्रतिनिधित्व करणाऱ्या 47 देशांतील 300 हून अधिक जण या परिषदेत सामील झाले. लेव्हल क्रॉसिंगवर सुरक्षिततेत सुधार करण्यासाठी अभियांत्रिकी पर्याय, नाविन्यपूर्ण उपाय आणि शैक्षणिक उपायांवर यावेळी सादरीकरण केले गेले. यंदा 14वी ILCAD आंतरराष्ट्रीय परिषद आज 9 जून 2022 रोजी डेन्व्हर (यूएसए) येथे आयोजित करण्यात आली आहे.

यंदाच्या कॉन्फरन्सची ठळक वैशिष्ट्ये (Theam) :

तंत्रज्ञान – लोकांना शिक्षित करणं, जागरुकता वाढवून लेव्हल क्रॉसिंगवर होणारे अपघात टाळण्यास मदत करणं.

अंमलबजावणी/नियमन – महामार्ग संहितेचे पालन करण्यास लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि पोलिस दलासह रेल्वेचे संयुक्त उपक्रम आयोजित करणे.

लोकसंपर्क कार्यक्रम – रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षितता आणि जोखमींबद्दल लोकांना जागरूक करणे.

रेल्वे क्रॉसिंग आणि धोके

निष्काळजीपणा: लेव्हल क्रॉसिंगमुळे होणारे अपघात आणि मृत्यू याला केवळ लोकांचा निष्काळजीपणाच नाही तर संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष ही काही वेळा जबाबदार असतं

मानवरहित क्रॉसिंग: बॅरिकेड्स नसलेली क्रॉसिंगस्, कोणत्याही सूचना प्रणालीचा अभाव आणि पुढे लेव्हल क्रॉसिंग आहे हे दर्शवणारी ग्राफिक्स किंवा संकेत चिन्ह नसणं.

योग्य प्रकाशाचा अभाव: काही क्रॉसिंगवर रात्रीच्या वेळी, योग्य प्रकाश व्यवस्था नसते, त्यामुळे लोकांना पुढे लेव्हल क्रॉसिंग आहे हे कळत नाही.

अयोग्य बॅरिकेडिंग: लोकसंख्या अधिक असलेल्या ठिकाणी लेव्हल क्रॉसिंग बंद असतानाच ते पार करण्याची मनोवृत्ती लोकांमध्ये दिसून येते. यामुळे त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. योग्य बॅरिकेडिंग केल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. कधीकधी लेव्हल क्रॉसिंगवर एका वेळी एकापेक्षा जास्त रेल्वे गाड्या क्रॉस होतात. जे लोक बॅरिकेड्स ओलांडतात त्यांच विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या गाडी कडे लक्ष जातं नाही आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

लेव्हल क्रॉसिंगवर मृत्यूला आळा घालण्यासाठी उपाययोजना

  • लेव्हल क्रॉसिंग सुरक्षा मोहिमे अंतर्गत जनतेला सुरक्षिततेबद्दल शिक्षित करण्यासाठी विभिन्न देशांची सरकारं विविध उपाययोजना करत आहेत. पुढील प्रयत्नांचा त्यात प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.
  • मानवरहित क्रॉसिंग बंद करणं किंवा त्यांना पूर्ण स्वयंचलित क्रॉसिंगमध्ये रूपांतरित करणं.
  • क्रॉसिंगची सुधारित ग्राफिक्स आणि संकेत चिन्ह दूरवरून ही सहज दिसू शकतील अशा प्रकारे लावणं.
  • ध्यानाकर्षित करणारे एलईडी ट्रॅफिक दिवे बसवून क्रॉसिंगचे सूचना फलक अधिक प्रकाशमान करणं.
  • पाठोपाठच्या गाड्यांबद्दल लोकांना सतर्क करण्यासाठी क्रॉसिंगवर प्रगत तंत्रज्ञान स्थापित कारणं.
  • लेव्हल क्रॉसिंगवर पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा उभारणं
  • रेल्वेच्या पायाभूत सुविधांशी छेडछाड करणाऱ्यांसाठी कठोर कायदे आणि दंड.
  • भारतात मानव रहित क्रॉसिंगस् वर कर्मचारी नियुक्त करून अथवा पूल किंवा सबवे बांधून, अपघात कमी करण्याचे प्रयत्न भारतीय रेल्वेने केले आहेत.

आकडेवारी

सुरक्षितते संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटनेच्या 2021 मध्ये प्रकाशित अहवालानुसार रेल्वे मार्गावरचे 90 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे अतिक्रमण आणि रेल्वे क्रॉसिंग वर झाले आहेत. 2020 रोजी प्रकाशित अन्य एका अहवालानुसार रेल्वे क्रॉसिंग वरची अपघात संख्या 2018 मधील 1408 वरून 2019 मध्ये 1788 वर गेली आहे.

आवाहन

जीवनात वेग, गती या गोष्टींना निश्चितच महत्त्व आहे पण जीवच नसेल तर या बाबी निरर्थक ठरतात. मी पाहिलेला हृदय पिळवटून टाकणारा, चिमुकल्या पाखरांची जीवनयात्रा भरारी घेण्या आधीच अकाली संपवणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग वरच्या अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सर्वच आपापल्या परीनं या संदर्भातल्या जनजागृतीच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलून हातभार लावूया.

 – लेखक भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्युज, (दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत.