घरताज्या घडामोडीराज्याच्या पोलीस महासंचालकपदी बिपीन बिहारी? सुबोध जैस्वाल पुन्हा केंद्रात?

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बिपीन बिहारी? सुबोध जैस्वाल पुन्हा केंद्रात?

Subscribe

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने प्रशासनात फेरबदल करण्यास सुरुवात केली असून फडणवीस सरकारच्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांना बाजूला करुन प्रशासनाची नवी घडी बसवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना पुन्हा केंद्रात पाठवण्याची तयारी नव्या आघाडी सरकारने सुरु केली असल्याचे वृत्त आहे. मंत्रालयात तशा हालचाली सुरु झाल्या असून जैस्वाल यांच्या जागी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी बिपीन बिहारी यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अर्थात बिपीन बिहारी यांच्या स्पर्धेत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी डी. कनकरत्नम यांचेही नाव चर्चेत असून काहीसे वादग्रस्त ठरलेले संजय पाडे हे देखील पोलीस महासंचालकपदासाठी ज्येष्ठ समजले जातात. त्यामुळे यापैकी कोण महाराष्ट्राचा पोलीस प्रमुख होतो. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच अचानकपणे आणखी तिसरे नाव पुढे येण्याचीही शक्यता आहे.

- Advertisement -

केंद्रात रॉच्या (RAW) सहसंचालकपदी असलेल्या सुबोध जैस्वाल यांना फेब्रुवारी २०१८ मध्ये महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले. करड्या शिस्तीचे आणि स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून जैस्वाल यांची पोलीस दलात ओळख आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या आग्रहामुळे जैस्वाल महाराष्ट्र पोलीस महासंचालक झाले. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाप्रणित देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होते. त्यामुळे राज्य पोलीस दलाचा कारभार हाकताना जैस्वाल यांना केवळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीसांशीच संपर्क ठेवावा लागत होता.

मात्र दिवाळीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांची महाविकास आघाडी होऊन या तीन पक्षांचे सरकार राज्यात स्थापन झाले. मुख्यमंत्रीपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यांकडे आले. तर आधी शिवसेनेकडे असलेले गृहखाते काही दिवसातच राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांकडे सोपवण्यात आले. गृहखात्यासाठी राष्ट्रवादीत बड्या नेत्यांमध्ये चुरस होती. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र गृहखात्याचा रिमोट एकप्रकारे स्वत:कडे कसा राहील? याची काळजी घेतली.

- Advertisement -

त्यामुळे राज्यात सत्तापालट झाल्याने पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल्यांचे वादळ घोंघावू लागले आहे. मात्र पोलीस महासंचालक असलेले सुबोध जैस्वाल हे त्यातील एक मोठा अडथळा ठरु लागले आहेत. जैस्वाल हे करड्या शिस्तीचे असल्याने फारसा राजकीय दबाव ते पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये चालू देत नाहीत. त्यामुळे नव्या सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या अद्याप होऊ शकलेल्या नाहीत.

त्यामुळेच जैस्वाल यांना पुन्हा केंद्रात पाठवण्याच्या हालचाली मंत्रालयात सुरु झाल्या आहेत. मात्र जैस्वाल यांच्या जागी कोण येणार याबाबतही मोठी चुरस आहे. भारतीय पोलीस सेवेतील १९८७ च्या बॅचमधील ज्येष्ठ पोलीस अधिकारी बिपीन बिहारी हे सर्वात ज्येष्ठ आहेत. तर त्यांच्यापाठोपाठ डी. कनकरत्नम यांचेही नाव वरिष्ठता यादीत आहे. आयपीएस संजय पांडे हे खरे तर १९८६ च्या बॅचचे आहेत. त्यामुळे ते सर्वात वरिष्ठ आहेत. मात्र मध्यंतरी काही काळ त्यांचा पोलीस दलात वरिष्ठांशी बेबनाव झाल्यामुळे स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. ते काही काळ पोलीस सेवेपासून अलिप्तही राहीले होते. मात्र नंतर त्यांनी कॅटकडे धाव घेतली आणि त्यानंतर त्यांना बढती देत राज्य सरकारने नवीन जबाबदारी दिली होती. मात्र यामुळे ते वरिष्ठ असूनही त्यांचा मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी विचार केला नव्हता.

त्यामुळे संजय पांडे यांचा अपवाद वगळता बिपीन बिहारी आणि डी. कनकरत्नम अशी दोनच नावे यात शिल्लक राहीली आहेत. अर्थात ऐनवेळी एखादे तिसरे नावही या स्पर्धेत येऊ शकते. त्यामुळे जैस्वाल केंद्रात जाणार हे जरी निश्चित मानले जात असले तरी राज्याचा पोलीस प्रमुख कोण होणार? हे मात्र अद्याप तसे गुलदस्त्यातच आहे.

Bipin Bihari and Subodh Jaiswal

पोलीस खात्यात संभ्रमता

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे आदेश निर्देश अंतिम असतात. गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांचे त्यातील निर्णय वेगळे असतात. त्यात उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादाही तिसरा एखादा निर्णय देतात आणि सर्वात महत्वाचा चौथा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा असतो. त्यामुळे नेमका कोणाचा निर्णय पाळायचा? असा प्रश्न पोलीस अधिकारी आणि सनदी अधिकाऱ्यांना पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -