नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे आयआरसीटीसी (IRCTC) हे संकेतस्थळ मंगळवार, 31 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा ठप्प झाले. ही सेवाच ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांना आरक्षण करता आले नाही. (irctc services down for the third time this month users faced issues in booking tatkal tickets)
नवीन वर्षासाठी वेळेत घरी पोहोचावे, कुटुंबीयांसोबत काही काळ आनंदात घालवावा, किंवा मग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शनाला जावे यासाठी वेगवान प्रवास म्हणून प्रवासी नेहमीच रेल्वेला प्राधान्य देतात. मात्र, ऐन मोक्याच्या वेळेसच रेल्वे बुकिंगच्या वेबसाईटने धोका दिल्याचा अनुभव प्रवाशांना आला. या एकाच महिन्यात प्रवाशांना तिसऱ्यांदा अशा त्रासाला सामोरे जावे लागले आहे. आयआरसीटीसीच्या सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना तात्काळ तिकीट काढण्यासाठी फार त्रास झाला. गाडी निवडण्यापासून पेमेंट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये प्रवाशांना ऍप आणि वेबसाईट या दोन्ही ठिकाणी अडचणींना तोंड द्यावे लागले.
वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर महिन्यात यापूर्वीही दोनवेळा आयआरसीटीसी (IRCTC) ची सेवा ठप्प झाली आहे. आजदेखील प्रवाशांना अशाच त्रासाचा सामना करावा लागला. यामुळे अनेक ग्राहक नाराज झाले तर काहींनी सोशल मीडियावर रेल्वे मंत्र्यांना टॅग करत याची तक्रार केली. यापूर्वी 9 डिसेंबर रोजी असाच मेसेज वेबसाइटवर दिसत होता आणि त्यानंतर 26 डिसेंबरला प्रवाशांना अशाच त्रासाला सामोरे जावे लागले.
आयआरसीटीसीकडून काहीही प्रतिक्रिया नाही
बुकिंग आणि तिकीट रद्द करण्याची सेवा पुढील तासभर खंडित राहील, असा मेसेज आज बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना दिसत होता. त्याऐवजी तिकीट रद्द करण्यासाठी किंवा TRD फाइल करण्यासाठी प्रवाशांना 139 या क्रमांकावर कस्टमर केअरला कॉल करण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, या सगळ्यावर आयआरसीटीसी कडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच त्यामुळे वेबसाइट डाऊन होण्याचे कारण देखील समोर आलेले नाही.
हेही वाचा – New Year 2025 : नव्या वर्षाच्या स्वागताला सारेच सज्ज, पहिल्याच दिवशी एवढी असेल लोकसंख्या!
या कारणांमुळे डाऊन होते सेवा
सर्व्हर, सॉफ्टवेअरमध्ये बिघाड तसेच नेटवर्कमधील गडबडीमुळे वेबसाइट डाऊन होतेच. मात्र, अनेकदा सणांचे दिवस किंवा सुट्ट्यांच्या काळात रेल्वे बुकिंग करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे तेव्हा देखील वेबसाइट डाऊन होते. तसेच वेबसाइट अपडेट करण्यासाठी वेळोवेळी मेंटेनन्स केला जातो, तेव्हादेखील वेबसाइट डाऊन होऊ शकते.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar