घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या प्रोत्साहन निधी अपहारात संचालक गणपत पाटलांचाही सहभाग?

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या प्रोत्साहन निधी अपहारात संचालक गणपत पाटलांचाही सहभाग?

Subscribe

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या प्रोत्साहन निधीतील कथित अपहारप्रकरणी दिंडोरीचे माजी संचालक गणपत पाटील व विभागीय अधिकार्‍याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप हाती लागली असून, दोघांच्या संभाषणामधून याप्रकरणात केवळ अधिकारीच नाही तर संचालकांचादेखील थेट संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे जिल्हा बँकेचा मुख्य कार्यकारी असताना गट सचिवांना पगाराव्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्याचा घाट त्याने घातला होता. हा निधी देण्याची कुठलीही तरतूद नसताना तसेच, संचालक मंडळानेदेखील हा निधी देण्यात येऊ नये, असा ठराव केलेला असताना संचालकांच्या ठरावात फेरफार करुन हा निधी गटसचिवांच्या नावे बाजूला काढण्यात आला. याप्रकरणी संचालकांचा विरोध हा केवळ दिखाऊपणा असल्याचे समोर आले असून, ऑडिओ क्लिपमधील संभाषणामुळे संचालकांचाच यात सहभाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

गटसचिवांच्या निधीसाठी वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे व जिल्हा बँकेचे तात्कालीन अध्यक्ष केदा आहेर यांचे वादग्रस्त स्विय सहायक वाय. के. पाटील यांना संचालक मंडळाचेच पाठबळ मिळाले असून, या व्हाईट कॉलर माफियांनी मिळून गटसचिवांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

गटसचिवांच्या निधीच्या अपहाराबाबत अनेक धक्कादायक बाबी आपलं महानगरने यापूर्वीच पुढे आणल्या आहेत. हा पैसा बँकिंग कामकाजाच्या वेळेनंतर म्हणजेच सायंकाळी 5 वाजेनंतर शैलेश पिंगळे आणि वाय. के. पाटील यांच्या आदेशाने संगणक प्रणाली अनलॉक करुन एकाचवेळी काढण्यात आला आहे. या सर्व प्रकारांची जुळवाजुळव करण्यासाठी झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप माय महानगरने प्रसिद्ध केल्यानंतर मध्यवर्ती बँकेत एकच खळबळ उडाली होती. या संभाषणात वादग्रस्त स्वीय. सहायक वाय. के. पाटील हे ‘बाबा’ सांगतील काय करायचे आहे ते’, असे विभागीय अधिकार्‍यांना सांगत आहेत. हे बाबा म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसुन बँकेचे दिंडोरी येथील संचालक गणपत बाबा पाटील असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यात बाबांची संभाषणाची ऑडिओ क्लिप आपलं महानगरच्या हाती आली असून, त्यातील संभाषणांमुळे या गंभीर प्रकरणात अधिकार्‍यांसोबत संचालक मंडळाच्या सहभागाचीदेखील शक्यता वाढली आहे. गणपत पाटील हे बँकेचे ज्येष्ठ संचालक असताना अशाप्रकारे भ्रष्ट अधिकार्‍यांनी त्यांनी साथ दिल्याचा दावा होत आहे. गणपत पाटील यांच्या माध्यमातून दिंडोरी शाखेतून तब्बल 27 लाख रुपये एकाच दिवशी काढले असून, त्यामुळे गणपत पाटलांच्या नावाची चर्चा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बड्या थकबाकीदारांमध्ये गणपत पाटलांचे नाव असून, पुरेसे क्षेत्र तारण नसताना त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने 17 कोटी रुपयांचे पीक कर्ज घेतले होते.

- Advertisement -

हे कर्ज गेल्या अनेक वर्षांपासून थकीत होते. त्यापैकी 9 कोटी रुपये हे गेल्या महिन्यात त्यांनी भरले आहे. अजून 7 कोटी रुपये त्यांच्या नातलगांकडे थकीत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे बँकेच्या कथित अपहारात संचालक मंडळाचा सहभाग स्पष्ट होत असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.

गटसचिवांच्या प्रोत्साहन निधीसंदर्भातील पैशांशी माझा कुठलाही संबंध नाही. हे पैसे मी कधीही काढण्यासाठी मदत केली नाही. : गणपत पाटील, माजी संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक

एसीबीचे आवाहन 

लाच स्विकारणे हा गुन्हा आहे. कायदेशीर कामांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तक्रारदारांनी ८८८८८००८०९ किंवा 1064 क्रमांकावर किंवा नाशिक कार्यालयात संपर्क साधून तक्रार करावी, तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल. : शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -