महाविकास आघाडी सरकार खरंच सेक्युलर आहे का?, अबू आझमींचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान (Common Minimum Program) कार्यक्रमाचीही आठवण करून दिली.

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सेक्युलर (Secular) आहे की सरकारचा चेहरा हिंदुत्ववादी बनला आहे? असा सवाल सपा नेते आणि आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी केला आहे. अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान (Common Minimum Program) कार्यक्रमाचीही आठवण करून दिली.

अबू आझमींनी पत्रात काय म्हटलं?

महाविकास आघाडी स्थापन होऊन अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किमान समान कार्यक्रम अंतर्गत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. या अतंर्गत सेक्युलर, सर्व जाती-धर्मांना एकत्र येऊन काम करण्याचं आश्वासन देऊन काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtravadi Congress), समाजवादी पार्टीने (Samajvadi Party) शिवसेनेला (Shivsena) समर्थन दिले, असं म्हणत त्यांनी सरकारला किमान समान कार्यक्रमाची (Common Minimum Program) आठवण करून दिली.

ते पुढे म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षांपासून मी आणि माझ्या पक्षाने भिवंडीचे आमदार रइस शेख (Raees Shaikh) यांनी अल्पसंख्यांकांचे मुद्दे आणि प्रश्न विविध माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षणासह हज कमिटीच्या सीईओची नियुक्ती, मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनची निर्मिती, वक्फ बोर्ड, उर्दू अकादमी, अल्पसंख्यांक विभागाचा विकास, अल्पसंख्याक समाजाचे व्यवसाय जसे की पॉवरलूम आदी समस्या आणि मागणी गेल्या अडीच वर्षात सरकारला सांगितल्या. पण महाविकास आघाडी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच, याआधी लिहिलेल्या पत्रांनाही अद्याप उत्तरे मिळालेले नाही.”

“महाविकास आघाडी सरकार खरंच सेक्युलर आहे का? की हिंदुत्व हे आघाडीचा नवा चेहरा आहे. यामुद्द्यांवर सरकारने का कारवाई केली नाही याचं उत्तर देणं महाविकास आघडी सरकारची जबाबदारी आहे”, असंही रइस शेख म्हणाले.