हे सरकार हिंदुत्वविरोधी आहे ? नामांतरावरून संजय राऊत यांची टीका

controversy about shiv sena mp sanjay raut raigad property after ed raids

ठाकरे सरकारने विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशीव केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला, पण हे निर्णय स्थगित किंवा रद्द केल्याचे मला समजले. तसे केले असेल तर हे सरकार हिंदुत्वविरोधी आणि महाराष्ट्रद्रोही आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

नागपूर दौर्‍यावर असलेल्या संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नामांतराच्या मुद्द्यावर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर कधी करणार, असा सवाल गेल्या काही दिवसांपासून भाजप विचारत होती. उस्मानाबादचे नामांतर धाराशीवसाठीही त्यांची हीच भूमिका होती. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मोर्चे काढण्यात आले होते.

भाजपचीच मंडळी आंदोलन करीत होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारची पर्वा न करता औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने स्थगिती दिली असेल, तर त्यांच्यासारखे ढोंगी लोक कोणीही नाहीत, असे राऊत म्हणाले.

बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार
मुळात हे सरकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे. मी सध्या नागपुरात आहे. माझा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे की हे निर्णय स्थगित करून तुम्ही काय साध्य केले? एका बाजूला तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय, असा आक्रोश करता आणि दुसरीकडे औरंगाबाद, उस्मानाबादबाबत घेतलेले निर्णय स्थगित करता, असेही संजय राऊत यांनी खडसावले.