Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सत्तेची नशा अशी असते का? पत्रकार मारहाण प्रकरणावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सत्तेची नशा अशी असते का? पत्रकार मारहाण प्रकरणावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Subscribe

मुंबई : जळगावच्या पाचोरा येथे स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी या पत्रकाराला दूरध्वनीवरून शिवीगाळ करून धमकीही दिली होती. यावरून, सत्तेची नशा अशी असते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

- Advertisement -

एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरण जळगाव जिल्ह्यात अलीकडेच घडले होते. यावरून संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने आमदार किशोर पाटील संतप्त झाले होते. त्यांनी पत्रकार महाजन यांना फोनवरून शिवीगाळ करून मारहाणीची धमकीही दिली होती. याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडीओ क्लिप माझीच असल्याचे सांगत पाटील यांनी, पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे. मी माझे शब्द मागे घेणार नाही, असे म्हटले होते. त्यापाठोपाठ आता या पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली.

या सर्व घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची… का? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बंदुकीच्या धाकावर अपहरण? आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह 15 जणांविरोधात गुन्हा

ज्या चौकात मारहाण झाली, त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी आले असेल. लोकशाही मूल्यांसाठी, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.

- Advertisment -