मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, नो डिस्कस, करायचे म्हणजे करायचे, मी सांगेन तेच करायचे… अशा त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. मंत्री तानाजी सावंत यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते धाराशीवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी बोलतानाचा हा व्हिडीओ आहे. तानाजी सावंत हे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना आजच ऑर्डर का़ढा असे सांगताना दिसत आहेत. त्यावर कुलकर्णी यांनी, डिस्कस करू, असे म्हटल्यावर नो डिस्कस, मी सांगितले तर करायचे म्हणजे करायचे, मी मुख्यमंत्र्यांचे असले काही ऐकत नसल्याचे तानाजी सावंत म्हणताना दिसत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ‘मी मुख्यमंत्र्याला ही घाबरत नाही,’ ही मंत्रिमंडळातील शिंदे गटातील मंत्र्यांची भाषा. सत्तेचा माज आणि गुर्मी हे मंत्री पोलिसांना दाखवत आहेत. पोलिसांना धाक दाखवणाऱ्या या मंत्र्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर निशाणा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांचा हाच व्हिडीओ शेअर करत, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले आहे. ‘गृहखात्याची अवस्था कोणीही यावं आणि टपली मारून जावं…,’ अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.