Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राजकारणासाठी 'औरंगजेब' लागणे हे कथित हिंदुत्वाचं दुर्दैव; कोल्हापूर प्रकरणी राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

राजकारणासाठी ‘औरंगजेब’ लागणे हे कथित हिंदुत्वाचं दुर्दैव; कोल्हापूर प्रकरणी राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : कोल्हापूर शहरातील काही तरुणांनी मंगळवारी (6 जून) शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला औरंगजेब आणि टिपू सुलतानचे फोटो ठेवल्याप्रकरणी वादाची ठिणगी पडली होती. या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी काल सकाळी 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळाने परिस्थिती चिघळली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा मारा केला. या प्रकरणी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, राजकारणासाठी औरंगजेब लागणे हे कथित हिंदुत्वाचं दुर्दैव आहे. संजय राऊत औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (It is the misfortune of alleged Hindutva to need ‘Aurangzeb’ for politics; Raut’s uproar against the government in the Kolhapur case)

कोल्हापूर प्रकरणी राजकीय नेते ऐकमेकांवर चिखलफेक करत आहेत, याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, चिखल ही सरकार आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकावर अपात्रतेची टांगती तलवार असली तरी हे सरकार सत्तेवर बसले आहे. भविष्यामध्ये सरकार पुढील तीन महिन्यात शंभर टक्के जाणार हे मी तम्हाला सांगतो. जरी आज सरकारने सत्तेवर असताना या राज्याच्या जनतेचं, मालमत्तेचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं हे त्यांचे कर्तव्य आहे. पण हे दंगली घडवत आहेत, कारण यांचा भविष्यातल्या निवडणुकांवर डोळा आहे. त्यामुळे यांना राजकारणासाठी औरंगजेब लागतो हे त्यांच्या कथित हिंदुत्वाचं दुर्दैव आहे, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांवर विश्वास; राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

काल देवेंद्र फडणविसांनी वक्तव्य केले होते की, विरोधी पक्ष बोलतात दंगल होणार, वातावरण बिघडणार यानंतर वातावरण बिघडत आहे. या आरोपावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुमचं इंटेलरिजन्स, गृहखात फेल आहे. आम्ही सुद्धा राजकारणात, पत्रकारिकेत आहोत. आम्ही या महाराष्ट्रावर राज्य केले आहे. आम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यात काय चालले आहे याची माहिती आहे आणि याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही सांगतो, पण तुम्ही काही करत नाही. तुम्ही फक्त कायदा आणि पोलीस यंत्रणा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी वापरतात. तुम्ही गुंडांच्या मुसक्या आवळत नाहीत. तुमचे समर्थक भ्रष्टाचारी लोक आहेत. त्यांना वाचविण्यासाठी तुम्ही यंत्रणा वापरत आहात आणि भविष्यात निवडणुका जिंकण्यासाठी, विरोधकांना कसा त्रास देता येईल यासाठी पोलीसांचा वापर करत आहात, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

ऑन एअर धमक्या आजपर्यंत कोणी दिल्या नव्हत्या
देवेंद्र फडणवीस यांनी काल कोल्हापूर प्रकरणी बोलताना ‘अचानक औरंगजेबाच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल आणि कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल’, असा इशारा दिला होता. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात अशाप्रकराच्या ऑन एअर धमक्या आजपर्यंत कोणी दिल्या नव्हत्या. फडणवीस म्हणतात औरंग्यांना सोडणार नाही, पण ते औरंगे तुम्ही तुमच्या अवती भोवती पोसताय. मोगलाई दुसरी काय होती? हीच मोगलाई होती. मोगलाई फक्त खान, सलीम, अब्दुल, अकबर नाही. मोगलाई ही वृत्ती आहे, विकृती आहे. हिंमत असेल तर करा या लोकांवर कारवाई, ज्यांनी ऑन एअर धमक्या दिल्या. तरच तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात. विरोधकांच्या बाबतीत आधी फाशी मग चौकशी आणि स्वतःच्या बाबतीत चौकशी नाही, तक्रार नाही, एफआयआर नाही, गुंडागुंडांचं खुल्ल समर्थन ही राज्याची सध्याची स्थिती आहे. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा की मी या राज्याचा गृहमंत्री आहे की नाही? असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केला.

- Advertisment -