Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रIT Sector Jobs : पुण्यात 100 जागांसाठी 3000हून अधिक इंजिनिअर्सची गर्दी, व्हिडीओ...

IT Sector Jobs : पुण्यात 100 जागांसाठी 3000हून अधिक इंजिनिअर्सची गर्दी, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

पुण्यातील एका कंपनीने 100 ज्युनिअर डेव्हलपर पदांवरील भरतीची जाहिरात केली होती. वॉक-इन मुलाखतीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. मुलाखतीसाठी जी तारीख दिली होती, त्या दिवशी खूप गर्दी झाली होती.

(IT Sector Jobs) पुणे : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यानिमित्ताने भारतातील बेरोजगारीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ आयटी क्षेत्रातील नोकरीसाठी असलेल्या स्पर्धेला अधोरेखित करतो. या पुण्यातील एका कंपनीबाहेर मोठी रांग लागल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत असून 3000हून अधिक अभियंत्यांची ही गर्दी आहे. मगरपट्टा येथे ज्युनियर डेव्हलपर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही रांग लागली होती. प्रत्येक तरुणाच्या हातात बायोडेटा आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांच्या फाइल्स होत्या. (Rush of engineers for jobs in Pune)

संबंधित कंपनीने 100 ज्युनिअर डेव्हलपर पदांवरील भरतीची जाहिरात केली होती. वॉक-इन मुलाखतीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. मुलाखतीसाठी जी तारीख दिली होती, त्या दिवशी खूप गर्दी झाली होती. सोशल मीडियावर या व्हिडीओबद्दल विविध प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये चेष्टा करण्याबरोबरच, निराशा आणि चिंता व्यक्त केली आहे. ‘एका आयटी कंपनीने एनालॉग पद्धतीने सीव्ही गोळा करणे, ही तर विनोदाची परिसीमा आहे, असे एका नेटिझन्सने म्हटले आहे. तुम्हाला ही रांग पाहून वाईट वाटत असेल तर कॅनेडियन किराणा दुकानात नोकरीसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी तर आणखी लांब रांगा लागत आहेत, असे दुसऱ्या युझरने म्हटले आहे. पुण्यातील व्हिडिओमध्ये 3 हजारांहून अधिक अभियंते वॉक-इन मुलाखतीसाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. याद्वारे आयटी जॉब मार्केटमध्ये किती टोकाची स्पर्धा आहे, हे स्पष्ट होते, असे आणखी एका युझरने म्हटले आहे.

काही युझर्सनी वैयक्तिक अनुभव आणि ऑब्झर्व्हेशन शेअर केले आहेत. 2015मध्ये जेव्हा मी पुण्यात मुलाखतीसाठी गेलो होतो तेव्हा सीटीएसचीही परिस्थिती अशीच होती, असा अनुभव एकाने सांगितला आहे. सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या आहे. नोकरीच्या संधी फारशा नसताना पालक शिक्षणावर अनावश्यक पैसे खर्च करत आहेत, असे मत एकाने मांडले आहे.

ऑक्टोबरमध्ये कॅनडामध्ये वेटर आणि सर्व्हिस स्टाफच्या पदांसाठी हजारो भारतीयांची अशीच रांग लागली होती. त्यावेळीही अशाच प्रकारची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्या निमित्ताने रोजगारासाठी संघर्ष तसेच स्थलांतराच्या ट्रेंडबद्दल चर्चा सुरू झाली होती. (IT Sector Jobs: Rush of engineers for jobs in Pune)

हेही वाचा – Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याबाबत राऊतांचे मोठे विधान