मिंधे-फडणवीस सरकारमुळेच सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनले, शिवसेनेचा उपहासात्मक टोला

मुंबई – “ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता, ज्या ब्रिटिश साम्राज्याने आमच्यावर दीडशे वर्षे राज्य करून आम्हाला गुलाम करून ठेवले, त्या ब्रिटनवर आता एका भारतीय वंशाच्या तरुण पंतप्रधानांचे राज्य आले. ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रातील मिंधे-फडणवीस यांच्या सरकारमुळे,” असा उपहासात्मक टोला शिवसेनेने लगावला आहे.

हेही वाचा – महापालिकेच्या निवडणुका कधी? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर आसूड ओढण्यात आले आहे. “सुनक यांनाच पंतप्रधानपदी नेमून भारतावरील लादलेल्या गुलामीचे प्रायश्चित्त घ्यावे असे एक पत्र महाराष्ट्रातून मिंधे-फडणवीसांना लिहिले गेले. ते पत्र रातोरात मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांच्या कार्यालयात पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीचे वाटप झाले. हे टपाल लंडनला पोहोचवून ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली गेली. आपण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसावे, यासाठी महाराष्ट्रात पडद्यामागे काय काय हालचाली झाल्या याची त्या सुनक साहेबांना कल्पनाही नसेल. सुनक यांना पाठिंब्यासाठी लागणारे खासदार सुरत, गुवाहाटी, गोव्यात आणून ठेवले होते काय? याचा खुलासा झालेला नाही. शिवाय जे खासदार सुनक यांना पाठिंबा देणार नाहीत त्यांना येथील ‘ईडी’ने ‘टाइट’ केले काय? ते मिंधे महाशयच सांगू शकतील,” असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा – अंतरा पाळणा लांबवतेय आणि आरोग्य राखतेय

सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच. लोक बेरोजगारी आणि उपासमारीने हवालदिल आहेत; पण सोने खरेदीच्या, शेअर बाजार वधारल्याच्या बातम्या आहेत. मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली, निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही 755 कोटींचे अर्थसहाय्य केले असे ‘बुडबुडे’ सोडत आहेत तर तिकडे त्यांचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बीडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात दारूचे ‘थेंब’ उडवीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी दारूगप्पा मारीत आहेत. उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’ असा प्रश्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच!