जळगाव : जिल्ह्यातील पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या मुकेश शिरसाठ याची त्याच्या सासरच्यांनी निर्घृणपणे हत्या केली. पाच वर्षांपूर्वी लेकीला पळवून नेल्याने त्याचा राग मनात ठेवूनच मुकेशची हत्या करण्यात आली. रविवारी (ता. 19 जानेवारी) दुकानात जायला निघालेल्या मुकेशला त्याच्या सासरच्यांनी रस्त्यात गाठून त्याच्यावर कोयत्याने आणि चॉपरने हल्ला केला. ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुकेशच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याच्या आईला भोवळ आली. पण त्याच्या आईकडून पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Jalgaon Crime Mukesh Shirsath mother in Jalgaon murder case breaks down)
मुकेश शिरसाट याचा सासरच्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्याची आई उज्ज्वला शिरसाठ म्हणाल्या की, माझ्या लेकराला ज्यांनी मारले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी धुणी भांड्याची काम करते. माझा नवरा हमाली करतो, मी त्याच्या दोन लेकरांना कसे सांभाळू. आता मी त्यांना कसे वाढवू. आम्हाला न्याय पाहिजे. प्रेम विवाह केला म्हणूनच त्या लोकांनी त्याची हत्या केली. चार वर्षांपासून ते आम्हाला त्रास देत होते, शेवटी त्याला मारून टाकले, असे म्हणत या आईने टाहो फोडला. तसेच, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली होती. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे खाल्ले, असा गंभीर आरोप मृत मुकेशची आई उज्ज्वला यांनी केला आहे. तर, आपण प्रेम विवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी माझ्या पतीची हत्या केली आहे. माझ्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुकेशची पत्नी पूजा हिने केली आहे.
हेही वाचा… Jalgaon Crime : जळगावात सैराटची पुनरावृत्ती, पाच वर्षांच्या संसारानंतर जावयाची हत्या
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या मुकेश शिरसाठ याने याच परिसरात राहणाऱ्या पूजा नावाच्या तरुणीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले. गेल्या पाच वर्षांपासून पूजा आणि मुकेश यांचा सुखी संसार सुरू आहे. मात्र, लेकीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्याचा राग आजही पूजाच्या घरच्यांमध्ये होता. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या दोन्ही कुटुंबामध्ये या ना त्या कारणावरून वाद होत होते. पण रविवारी या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, ज्यामध्ये पूजाच्या घरच्यांनी मुकेशवर कोयता व चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला. ज्यामध्ये मुकेशचा जागीच जीव गेला.
या घटनेवेळी मुकेशच्या बचावाकरिता गेलेल्या मुकेशच्या भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही हल्ला केला. ज्यामध्ये हे सर्व जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर निघाला, त्याचवेळी पूजाच्या माहेरच्यांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर कोयता, चॉपरने वार केले. या घटनेमुळे जळगावात तणाव निर्माण झाला असून पूजाने तिच्या माहेरातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.