चार दिवसांपूर्वी जालन्यात एका टोळक्याने प्रेमी युगलाला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. याच प्रेमी युगलाचे बुलढाण्यात लग्न पार पडले आहे. बुलढाण्याच्या मेंढगावातील मंदिरात त्यांनी लग्न केले असून त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेमके काय घडले होते?
बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रेमी युगल चार दिवसांपूर्वी जालन्यातील गोंदेगावात फिरण्यासाठी गेले होते. तळ्याच्या दिशेने जात असताना एका टोळक्याने त्यांना गाठले आणि धमकवण्यास सुरुवात केली. तसेच त्यांचा व्हिडिओ देखील काढला. त्यामध्ये हे प्रेमी युगुल अनेक प्रकारे विनवण्या करत होते. ‘आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. तळे असल्यामुळे आम्ही फिरायला आलो’, असे तरुण लतीगतीला येऊन चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हाता-पाया देखील पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र, त्या टोळक्याने तरुणीच्या वडिलांना फोन करण्यास सांगितले.
तसेच टोळक्याने काढलेल्या व्हिडिओमध्ये गावगुंड तरुणीची कॉलर पकडून तिला फरपटत नेताना दिसत आहे. तर दुसरीकडे तरुणी ‘दाद,तिला सोडा, आम्ही चुकीचे काहीच केलेले नाही’, अशा शब्दात गयावया करत होता. तर तरुणाने आपल्या भावाला फोन लावून बोलवून घेण्याचीही विनंती केल्याचेही त्या व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे गावगुंडानी काढलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी जालना पोलिसांनी अतिष खंदारे या मुख्य आरोपीसह कारभारी वाघ, कृष्णा वाघ, सुशील वाघ यांना १ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. या आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असून कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसांची वाढ केली आहे.
हेही वाचा – हिंगणघाट जळीतकांड – ‘ते असं काही करतील, वाटलं नव्हतं – आरोपीची पत्नी