जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानं 4 सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात आला आहे. तसंच, संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाकडून पुणे, अहमदनगर, बीड, जालना, पैठण मार्गावरील बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कन्नड, सिल्लोड मार्गावरील बसची प्रवासी वाहतूक अंतरिम सुरू ठेवली आहे. परिणामी याचा फटका तलाठी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. (Jalna Talathi exam hit by Maratha movement ST closure major problem for students)
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी, एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केल्याचं म्हटलं होतं. परंतु, अद्याप परीक्षा पुढे ढकलण्याबाबत प्रशासनाकडून कोणतंही अधिकृत वृत्त समोर आलेलं नाही.
तलाठी परीक्षेसाठी जाणारी विशेष बसफेरी रद्द
जालन्यातील घटनेनंतर मराठवाड्यातील सर्व बस सेवा ठप्प झाल्या आहेत. एकट्या हिंगोली जिल्ह्यातील 660 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज तलाठी भरती परीक्षेसाठी अमरावतीला जाणाऱ्या उमेदवारांच्या सोयीच्या दृष्टीनं हिंगोली आगारातून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळी ही बस सा़डेपाच वाजताच्या सुमारासा हिंगोली आगारातून निघणार होती. मात्र बसमधून जाण्यासाठी प्रवाशीच नसल्यानं अखेर ही बस सकाळी सहा वाजता रद्द करण्यात आली आहे. या तलाठी भरतीच्या उमेदवारांना कालच एक मेल प्राप्त झाला होता. त्यामध्ये वेळेच्या अगोदर परीक्षा केंद्रवर उपस्थित राहा, अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत.
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी शुक्रवारी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्याला हिंसक वळण लागलं. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबरी गोळ्याही झाडल्या. जमावाच्या दगडफेकीत एका वाहनाच्या काचा फुटल्या, तर आंदोलकांनी एका मालवाहू वाहनास आग लागली. दगडफेकीत जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत.
(हेही वाचा: मराठ्यांसाठी ‘राज’ मैदानात; जालन्यातील आंदोलकांची घेणार भेट )