जायकवाडी लवकरच निम्म्यावर; नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा संघर्ष टळणार

नाशिक : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे जिल्हयातील १२ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून ३७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून यामुळे नगर, मराठवाडयाला मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिकमधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जायकवाडी धरण तब्बल ४३ टक्के भरले असून अशीच स्थिती कायम राहील्यास जायकवाडी ५० टक्क्यांचा टप्पा गाठेल. यामुळे यंदा नाशिक मराठवाडा संघर्ष टळणार आहे.

जायकवाडी धरण ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील गंगापूर, दारणा, पालखेड, प्रवरा, मुळा, भंडारदरा धरण समुहातून मेंढेगिरी समितीच्या तक्ता सहानुसार पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाने आदेश आहेत. परंतू जुलैमध्येच जायकवाडीचा पाणीसाठा निम्म्यापर्यंत आला आहे. सद्यस्थितीत जायकवाडीचा जलसाठा ४३ टक्क्यांवर आला आहे. नाशिक जिल्हयात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. नागरिक पावसाने बेजार झाले आहेत. मागील ४ दिवसांच्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून १० हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. मंगळवारी पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला मात्र बुधवारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने दुपारी ४ वाजेच्या सुमारास गंगापूर धरणातून साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मागील ४ दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून ८० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर तो कमी करण्यात येऊन ५८ हजार ६९७ क्युसेक विसर्ग करण्यात आला. धरणातून हा विसर्ग सुरू असल्याने मागील चोवीस तासांत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठयात तब्बल साडेसहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत जायकवाडीसाठी नाशिकमधून ६ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अशीच स्थिती पुढील काही तासांत राहील्यास जायकवाडी ५० टक्के भरणार असल्याची माहिती आहे.