मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 4 तास बैठक झाल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट ही गुप्त नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक नव्हती. एखाद्या ओळखीच्या व्यक्तींच्या घरी भेट झाली. मी पवारसाहेब गेलो होतो. मी गेल्यानंतर काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. कालची भेट आणि ईडीच्या नोटिशीचा काही संबंध नव्हता. कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची गरज नाही. अशा भेटीगाठी होत असते.”
हेही वाचा – पवार काका – पुतण्यांची पुण्यात बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर गुप्त भेट; चर्चा मात्र गुलदस्त्यात
भावाला आलेल्या ईडी नोटिसीसंदर्भात जयंत पाटील म्हणाले…
तुमच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आली, असा प्रश्न जयंत पाटलांना विचारल्यावर ते म्हणाले, “माझ्या भावाला ईडीची नोटीस आली आहे. एका कंपनीसंदर्भात ईडीने त्यांना माहिती विचारली आहे आणि माझे बंधू हे चार दिवसांपूर्वी जाऊन देखील आले. कालच्या भेटीचा आणि याचा काही संबंध नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही, सगळेच शरद पवारांचा फोटो लावतात. आम्ही पवारांसाठी काम करतोय. यामुळे पक्षात फूट पडल्याचे दिसत नाही.”
हेही वाचा – अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले…
काका-पुतण्याच्या भेटीवर फडणवीस म्हणाले…
शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीसंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला या भेटीबद्दल काही माहिती नाही. या भेटीसंदर्भातील काही तपशील माझ्याकडे नाही. भेटी झाली नाही, किती वेळ झाली. यासंदर्भातील कोणतीही माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी तुमच्या ज्ञानात काही भर टाकून शकत नाही.”