शरद पवारांचा राजीनामा मंजूर न करण्याचं कारण काय? जयंत पाटलांचा मोठा खुलासा

Jayant-Patil

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीच आज बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजीनामा फेटाळल्यानंतरही पवारांनी अंतिम निर्णयावर विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. परंतु या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा मंजूर न करण्याचं कारण काय?, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.

जयंत पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांनी अचानक निर्णय घोषित केल्यामुळे कार्यकर्त्यांसह अनेकांच्या भावनेचा उद्रेक झाला. सर्वांचं समाधान करणारी व्यक्ती म्हणून आजही आमच्या पक्षात किंवा देशपातळीवर पवारांकडे पाहिलं जातं. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आपुलकीची भावना आहे. कारण राज्यातील नेत्यांना पवारांनी तयार केलंय, असं जयंत पाटील म्हणाले.

येत्या ८ महिन्यांमध्ये लोकसभा निवडणूक असून विधानसभेच्याही निवडणुका पार पडणार आहेत. एवढ्या काळात नव्या नेतृत्वासह पक्ष कसा जिंकायचा? राष्ट्रवादीचा ब्रँड शरद पवार आहेत. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. जर निवडणुकीला चार वर्ष वैगरे राहिले असते तर निर्णय ठीक होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : शरद पवारांचा राजीनामा मागे पण अजित पवार कुठेत?