अतिवृष्टीबाधित भागासह शेतकऱ्यांच्या जमिनीचे तात्काळ पंचनामे करा – जयंत पाटील

जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याची वाहन क्षमता कमी झाली आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेत या कालव्यांची सुधारणा केली जाईल व आधुनिकीकरण केले जाईल.

Jayant Patil orders officers to make Immediate panchnama flood prone areas

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, महाडमध्ये पुरस्थिती आणि दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या भागातील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तात्काळ सादर करा असे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त प्रकल्पांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यासाठी जयंत पाटील यांनी सूचना दिली आहे. जमीनींचे तात्काळ पंचनामे करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज परभणी जिल्ह्यात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती व इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ममदापूर, जोड परळी, कोटा आणि पिंपळगाव कुटे हे नवे बंधारे पाणी उपलब्धतेअभावी प्रलंबित होते. मात्र आता हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रस्तावित बंधारे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

कालवे अत्याधुनिक करण्यात येणार

जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याची वाहन क्षमता कमी झाली आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेत या कालव्यांची सुधारणा केली जाईल व आधुनिकीकरण केले जाईल. उच्च दर्जाचे काम करत हे कालवे अत्याधुनिक केले जातील असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपूरकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

भारत बंदला राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा

भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून दिनांक २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. देशभरातील १०० पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा : Monsoon Update : देशात मॉन्सूनचा मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला