हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्व शिकवायला त्यांच्याच दारात जात असाल तर… – जयंत पाटील

अमरातवीच्या आमदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वांद्रे कोर्टाचे न्यायाधीश ए.ए.घनीवाले यांनी हा निर्णय दिला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिलला सुनावणी होणार आहे. काहीच करता येत नसल्याने भाजप त्यांच्याच आमदार आणि खासदारांना काही गोष्टी करायला लावत आहेत. स्वत:च अराजकता माजवण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्व शिकवायला त्यांच्याच दारात जात असाल तर त्याची प्रतिक्रिया येणारच, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत बॉम्बब्लास्ट झाला होता. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. तसेच अराजकता माजली नव्हती, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आता काहीच करता येत नाहीये. त्यामुळे भाजपा आपल्याच आमदार आणि खासदारांना अशा गोष्टी करण्यास भाग पाडते आणि अराजकता माजली आहे, असं स्वत:च म्हणते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्व शिकवायला कोणी हनुमान चालीसा घेऊन त्यांच्या दारावर जात असेल, तर त्याची प्रतिक्रिया येणारच, असं जयंत पाटील म्हणाले.

या प्रकरणामुळे राजकारण एकदम खालच्या स्थरावर जायला लागलं आहे. कशा पद्धतीने आपली सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे भारतीय जनता पक्षातून व्यक्त होत आहे. तसेच सर्व उपाय थकल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करायचा त्यांचा प्रयत्न दिसतोय, असं पाटील म्हणाले.

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले होते. तेव्हा पोलिसांनी पाठवलेली नोटीस झिडकारून त्यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं, त्यामुळे हा तणाव निर्माण झाला. या कारणामुळे राणा दाम्पत्यावर कलम १२४ (अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. कुणी थेट कुणाच्याही घरात शिरले तर स्वसंरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. अशावेळी कुणी तुमच्या किंवा माझ्या घरात शिरले तर कारवाई होणारचं, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिवसेनेचं समर्थन केलं आहे.


हेही वाचा : नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनावर 29 एप्रिलला होणार सुनावणी