जळगाव : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाची मोर्चेबांधणी करण्यास नव्याने सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, नेते एकनाथ खडसे, आमदार रोहित पवार तसेच इतर नेतेही उपस्थित असल्याचे पाहायला मिळतात. आज (ता. 05 सप्टेंबर) शरद पवार यांची स्वाभिमान सभा ही जळगाव जिल्ह्यामध्ये पार पडली. दुपारच्या कडकडीत उन्हात ही सभा पार पडली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यावरून राज्य शासनावर टीका केली. तर जालन्याच्या मुद्द्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. (Jayant Patil reply to Ajit Pawar on Jalna issue)
हेही वाचा – मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवा; कपिल पाटलांचं सरकारला पत्र
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा समाजाकडून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्यात येत होते. परंतु या आंदोलनावर मागील आठवड्यात शुक्रवारी पोलिसांकडून अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. ज्यानंतर आता हा वाद चिघळला आहे. मराठा आंदोलकांवर जो अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला तो सरकारच्या आदेशानेच करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काल (ता. 04 सप्टेंबर) आव्हान देण्यात आले. लाठीहल्ला करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मग असे असेल तर ते सिद्ध करून दाखवा. आमच्या तिघांपैकी कुणी तसे आदेश दिले असतील तर मी राजकारणातून बाजूला होईन. पण तसे सिद्ध नाही झाले, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावे. आहे का हिंमत? असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
अजित पवार यांच्या आव्हानाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण देण्याचा 10 वेळा प्रयत्न झाला. आमचे सरकार असताना ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हापासून याबाबत निर्णय घेण्यात आला. पण वेगवेगळ्या वेळी कोण कोर्टात गेले आणि कोर्टात त्यांना कोण मदत करत होते. त्यावेळी किती मोठे वकील लावण्यात आले. याबाबत गुगल करून अभ्यास करा. कोणती प्रवृत्ती कोर्टात जाते. कोण त्यांना मदत करत होते, याबाबतची नावे पाहिली तर तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल, अशी टीका जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आली.
आपल्या सर्वांच्या समोर अनेक प्रश्न आहेत. परंतु काल-परवा मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री एकत्र बसले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्यातला कोणी लाठीहल्ल्याचा आदेश दिला असेल तर ते सिद्ध करून दाखवा, मग आम्ही राजकारण सोडू. पण तुमचे सरकार आहे. तुम्ही मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तुम्हाला न विचारता पोलीस जर लाठीहल्ला करत असतील तर तुम्हाला सरकारमध्ये राहायचा अधिकार आहे का? तुम्हाला न विचारता जर का लाठीचार्ज झाला तर तुम्ही सरकारमध्ये काय करत आहात? तुम्हाला न विचारता जर पोलीस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील तर हे महाराष्ट्रातल्या शेमड्या पोराला देखील पटणार नाही. तुम्हाला न विचारता पोलिसांनी जर का त्या ठिकाणी लाठीहल्ला केला असेल तर त्या सारखी दुसरी गंभीर घटनाच नाही. पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था ठेवणाऱ्या लोकांवर या सरकारचे नियंत्रण नाही, असे यामधून सिद्ध होते, असे प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवर दिले आहे.