राष्ट्रवादीला राज्यातील सर्वात मोठा पक्ष करण्यासाठी एकसंघ प्रयत्न करुया, जयंत पाटलांचे आवाहन

२३ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करताना राज्यात पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल असा निर्धार केला होता याची आठवणही सांगितली. राज्यातील सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होईल अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

jayant patil said Let's make a united effort to make NCP the largest party in the state
राष्ट्रवादीला राज्यातील सर्वात मोठा पक्ष करण्यासाठी एकसंघ प्रयत्न करुया, जयंत पाटलांचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यातील सर्वात मोठा पक्ष करण्यासाठी एकसंघ प्रयत्न करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केले आहे. जयंत पाटलांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल असा निर्धार केला होता याची आठवणसुद्धा जयंत पाटील यांनी करुन दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, तुम्हा सर्वांचे कष्ट, प्रयत्न, जिद्द यातूनच आपला पक्ष इथपर्यंत आला आहे. याची आम्हा सर्वांना जाणीव असून राष्ट्रवादी हा पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. यासाठी एकसंघपणे प्रयत्न करूया असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने पक्षाला मिळालेल्या उभारीबद्दल जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

दरम्यान, आपला पक्ष तेवीस वर्षांचा झाला आहे. आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्रातील नव्या पिढीला भविष्यातील आशा दिसत आहे. अनेक तरूण पक्षात काम करण्यास इच्छुक आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरु आहे, हे पक्ष वाढण्याचे एकमेव कारण आहे, असे जयंत पाटील यांनी यावेळी नमूद केले. २३ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करताना राज्यात पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल असा निर्धार केला होता याची आठवणही सांगितली. राज्यातील सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होईल अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

पक्षात पहिला प्रांताध्यक्ष होण्याचा मान

पक्ष स्थापन झाल्यावर प्रांताध्यक्ष होण्याचा मान सर्वप्रथम मला मिळाला. राज्यात पक्षाची कोणतीही बांधणी नसताना काँग्रेस खालोखाल क्रमांक दोनचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला. तेव्हापासून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण काम करत आहोत असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. शरद पवारांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून राज्यात आरक्षण मिळवून दिले. या आरक्षणाला नख लावण्याचे काम काही शक्तींकडून होत आहे. मात्र त्याविरोधात आपण सक्षमपणाने लढा देतोय अशी माहितीही छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

देशात निरनिराळ्या प्रश्नांची माहिती असलेले व त्यांची सोडवणूक करण्याची ताकद असलेले नेते म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहेत. आपण पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल अधिक वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले. आपल्याला पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडायची असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले.


हेही वाचा : जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपचा आक्षेप, २ मतं बाद करण्याची मागणी